पाण्याच्या समस्येने आधीच हैराण झालेल्या मनमाडकरांना आता तहान भागविणेही मुश्कील होण्याची चिन्हे दिसत आहेत. नगर परिषदेने कोटय़वधी रुपयांची थकबाकी न भरल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणासह शहरातील पाणीपुरवठय़ाच्या विविध भागांतील नऊ केंद्रांचा वीजपुरवठा मंगळवारी महावितरणने खंडित केला आहे. शहराला सध्या १५ ते २० दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे.
पालिकेकडे पथदीपांचे तीन कोटी ४० लाख रुपये, पाणीपुरवठा विभागाचे सुमारे १४ लाख, प्रशासकीय कार्यालयांचे सुमारे एक लाख रुपये अशी थकबाकी आहे. वीज मंडळाचे कार्यकारी अभियंता पी. आर. पवनीकर आणि सहाय्यक अभियंता के. एस. व्यास यांनी या बिलांसंदर्भात यापूर्वी पालिकेला अनेकदा नोटीस दिली आहे, परंतु पालिकेने त्याची दखल न घेतल्याने मंगळवारी सकाळी महावितरणचे सहाय्यक अभियंता व्यास यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली. सुमारे १४ लाख रुपयांची थकबाकी असल्याने वागदर्डी धरण, तसेच शहरातील चंदनवाडी, येवला रोडवरील पी अॅण्ड टी कॉलनी, कुलथे कॉलनी, हुडको-सावरकरनगर, बुधलवाडी, १५२ नंबर विभाग, या नऊ ठिकाणांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.
शहरातील थकीत पाणी बिलाबाबत पालिका प्रशासनाला १५ दिवसांपूर्वी वीजपुरवठा खंडित करण्याची लेखी नोटीस देण्यात आली होती. परंतु पालिकेने दखल न घेतल्याचे महावितरण अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पथदीपांची सुमारे तीन कोटी ४० लाखांची थकबाकी डिसेंबर अखेपर्यंत भरण्याचे आश्वासन पालिकेने पत्राद्वारे दिल्याचे व्यास यांनी सांगितले. पालिकेची जुनी प्रशासकीय इमारत, नवीन वाचनालयाच्या जागेत हलविण्यात आलेली पालिकेची कार्यालये तसेच मुख्याधिकारी यांचा बंगला येथील वीज बिलाची थकबाकी सुमारे एक लाख रुपयांवर असून या ठिकाणांचा वीजपुरवठा एक-दोन दिवसांत खंडित करण्यात येणार आहे. पालिकेची सध्याची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट असून ही थकबाकी जुनी आहे. तसेच पाणीपुरवठा सेवा ही अत्यावश्यक सेवा असल्यामुळे याबाबत महावितरणने थकबाकीवसुलीचे धोरण शिथिल करावे, अशी विनंती पालिकेतर्फे करण्यात आली आहे.
शहरात सध्या दिवसा व रात्रीचे सहा तासांचे भारनियमन आहे. थकबाकी व गळतीमुळे मनमाड शहर हे ‘ई’ वर्गात टाकण्यात आले आहे. त्यामुळे दररोज सात ते दहा तास भारनियमन अनिवार्य झाले आहे. नगर परिषदेने काही प्रमाणात थकबाकी भरल्यास वसुलीची टक्केवारी वाढवून शहराची रात्रीच्या भारनियमनातून मुक्तता होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने प्रयत्न व्हावेत अशी नागरिकांची अपेक्षा आहे.