समुद्रातील खड्डय़ांमुळे जाताहेत जीव
मुंबईतील सर्वच चौपाटय़ांवर बुडून मृत्यू होण्याचे प्रकार अधूनमधून घडत असले तरी यापैकी अक्सा बीच सर्वात जास्त धोकादायक ठरत आहे. अक्सा चौपाटीवर सरकत्या वाळूमुळे किनाऱ्याजवळ तयार होणारे खड्डे या जीवघेण्या अपघातांचे मुख्य कारण आहे.
अक्सा चौपाटीवर अनेक वर्षे जीवसंरक्षक म्हणून काम करणारे रजनीकांत माशेलकर यांनी ‘वृत्तान्त’ला सांगितले की, अक्सा चौपाटीचा आकार हा इंग्रजी ‘यू’ अक्षरासारखा आहे. येथील समुद्रात कायम खड्डे असतात. या खड्डय़ांचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे त्यांची जागा अधूनमधून बदलत राहते.
भरती-ओहोटीमुळे हे खड्डे तयार होतात. खड्डय़ात पाऊल गेले की ती व्यक्ती आत खेचली गेल्याने पाण्यातून बाहेर पडणे कठीण होते. पाण्याला प्रवाह असल्याने कितीही चांगले पोहता येत असले तरी खड्डय़ात पाय गेल्यानंतर त्यातून बाहेर कसे पडायचे ते कळत नसल्याने पाण्याच्या प्रवाहाबरोबर आत खेचले गेल्याने जीव जातो. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि तरुण येथे मोठय़ा संख्येने येतात. काही जण भर समुद्रात क्रिकेट, फुटबॉल, पळापळी खेळतात. हे करताना आपण समुद्रात किती खोलवर जातोय, याचे भान त्यांना राहात नाही आणि ते जेव्हा भानावर येतात तेव्हा खूप उशीर झालेला असतो. ९ जुलै २००० रोजी क्रिकेट खेळताना चेंडू दूरवर गेला म्हणून तो आणण्यासाठी खोल समुद्रात गेलेल्या १२ जणांचा मृत्यू झाला होता, असेही माशेलकर यांनी सांगितले.
अग्निशमन दलातील अधिकारी प्रभात रानडे म्हणाले की, मुंबईतील अक्सा, गोराई येथील समुद्रातील वाळू ही सरकती आहे. वाळू सरकती असल्याने समुद्रात खोलवर गेलेल्यांना त्याचा अंदाज येत नाही आणि पाण्याच्या प्रवाहाबरोबर वेगाने आत खेचले जाऊन त्याची परिणती जीव जाण्यात होते. ज्यांना चांगले पोहता येते, अशांचाही अक्सा समुद्रात बुडून मृत्यू झालेला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन, अग्निशमन दल यांच्याकडून ज्या चौपाटय़ा धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत, तेथे समुद्राच्या पाण्यात जाऊच नये. खबरदारीचा इशारा देऊनही कोणी समुद्रात जात असेल तर ते आत्महत्या करण्यासाठीच उचललेले पाऊल आहे.