तुर्भे सेक्टर-२४ येथे पंधरा वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या एका इमारतीतील छत घरात झोपलेल्या अक्षय शिंदे या तरुणाच्या छातीवर कोसळून मृत्यू झाल्याने नवी मुंबईतील शेकडो इमारतींच्या सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. छत कोसळण्याचा घटना वारंवार घडत असताना छत कोसळून अद्याप जीवितहानी झाली नव्हती, त्यामुळे आता तरी शासन शहरातील धोकादायक इमारतींच्या पुनर्बाधणीचा विचार करणार आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे. छत कोसळून जखमी होणाऱ्याची संख्या जास्त असताना एफएसआयच्या चर्चेत सरकार आणि सिडको पिंगा घालत असल्याने रहिवाशांच्यात नाराजीची भावना पसरली आहे.
तुर्भे येथील अपघातग्रस्त इमारत ही साडेबारा टक्के योजनेंर्तगत बांधण्यात आली होती. नवी मुंबईतील भौगोलिक स्थिती आणि वातावरण वेगळे असल्याने या ठिकाणी इमारतींचे बांधकाम खराब होण्याची प्रक्रिया वेगाने घडणारी आहे. खाडीकिनारी मिठागरांवर भराव टाकून वसविण्यात आलेल्या या शहरातील प्रत्येक बांधकामातील सळई सडण्याची क्रिया लवकर होत असल्याने त्या निकृष्ट ठरत आहेत. त्यामुळे स्टॅक्टरल ऑडिट केल्यानंतर धोकादायक म्हणून जाहीर झालेल्या इमारतींची लवकरात लवकर पुनर्बाधणी करण्यात यावी, अशी मागणी गेली अनेक वर्षे केली जात आहे. त्यात वाशी येथील जेएनजेटू इमारतींचा दुरवस्था तर कोंबडीच्या खुऱ्हाडय़ापेक्षा वाईट झालेली आहे. अनेक तापसणी करून इमारती बांधणाऱ्या सिडकोच्या इमारतींची ही स्थिती असेल तर खासगी बिल्डरांनी बांधलेल्या साडेबारा टक्के योजनेतील तसेच शहरातील इमारतींची काय अवस्था आहे याची कल्पना तुर्भे येथील दुर्घटनेमुळे समोर आली आहे. त्यामुळे अख्ख्या शहराचीच पुनर्बाधणी करण्याची आवश्यकता असल्याचे आता दिसून येते. याच भावनेतून पुनर्बाधणीची मागणी जोर धरू लागली आहे. पालिकेने अडीच एफएसआयमधून धोकादायक इमारतींची पुनर्बाधणी करण्यात यावी, असा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी शासनाला सादर केला आहे तर सिडकोने प्रथम दोन आणि आता तीन एफएसआयची मागणी करून संभ्रम निर्माण केला आहे. त्यामुळे एफएसआयचे घोंगडे नगरविकास विभागात भिजत पडले आहे. आचारसंहिता तोंडावर आलेली असताना त्याबाबत निर्णय होत नसल्याने रहिवाशांच्या सहनशीलतेचा बांध फुटू लागला असून त्याचा फटका नवी मुंबईतील सत्ताधारी राष्ट्रवादी पर्यायी पालकमंत्री गणेश नाईक यांना बसणार आहे, हे स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे एका तरुणाच्या बळीनंतर तरी हा एफएसआयचा प्रश्न सुटावा, अशी मागणी केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dangerous buildings problems still pending
First published on: 23-08-2014 at 06:40 IST