सोडोनिया संसार गेले देशांतरा कुणी,
तळेमळे ओस झाले पाण्याच्या कारणी,
पाणी पाणी पाणी आणि पाणी पाणी पाणी,
पाण्याविना सैरावैरा आम्ही अनवाणी
ना. धों. महानोर यांनी दुष्काळग्रस्तांच्या वेदना किती चपखल शब्दांत मांडल्या आहेत. दुष्काळग्रस्तांच्या या वेदनांवर फुंकर मारण्याचे प्रयत्नही आता सर्व स्तरातून होत आहेत. दुष्काळग्रस्तांसाठी पैशाचा वा अन्य साधनांचा निधी उभारून. पण, दया आणि सहानुभूतीच्याही पलीकडे जाऊन दुष्काळग्रस्तांमधील वैफल्यग्रस्त तरूणांची मने सावरणारा, त्यांना हिंमत देणारा एक उपक्रम सध्या मुंबईत उभा राहू पाहतो आहे. हा उपक्रम आहे, दुष्काळग्रस्त भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता ‘हिंमत भत्ता’ उभारण्याचा.
साधारणपणे कोणतीही नैसर्गिक आपत्ती आल्यास तिथल्या ग्रस्तांकरिता पैशाचा निधी उभारला जातो. मग या पैशातून अन्नधान्य, कपडेलत्ते आदी साहित्य पुरविले जाते. यातून दुष्काळग्रस्तांना दिलासा मिळाला तरी तो तात्पुरता असतो. मोडलेली मने सावरण्याचा प्रयत्न अशा निधीतून क्वचितच होतो. म्हणूनच मदतीबरोबर तरूणांच्या मनात हिंमत निर्माण करण्याचा छोटासा प्रयत्न हिंमत भत्त्याच्या माध्यमातून केला जाणार आहे.
ज्या तरूणांना ही मदत मिळेल त्यांच्यावर विशिष्ट कामाची जबाबदारी सोपविली जाईल. ही जबाबदारी म्हणजे आपल्या गावात पडलेल्या दुष्काळाच्या कारणांचा ठाव घेणे. आपल्या गावातील पाण्याचे स्त्रोत का आटले, गावासाठी जाहीर झालेल्या कोणत्या योजना अडल्या आहेत, चारा छावणीतील परिस्थिती काय, योजनेतून मिळणाऱ्या निधीचे काय होते, याचा शोध त्या त्या गावातील तरूणांनी आपापल्या क्षमतेनुसार करायचा आहे.
‘कमवा आणि शिका’ या घोषणेला पुढे ‘आणि दुष्काळ हटवा’ची जोड देऊन ‘शिक्षक भारती’ या शिक्षक संघटनेच्या पुढाकाराने ही योजना राबविण्यात येणार आहे. हिंमत भत्त्यासाठी उभारण्यात आलेल्या या ‘स्टुडंट्स रिलीफ फंड’चे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी असून उपाध्यक्ष साहित्यिक नागनाथ कोतापल्ले आणि आमदार कपिल पाटील आहेत. स्वत: न्या. धर्माधिकारी यांनी आपल्या पेन्शनमधून १० हजाराची मदत या निधीला केली आहे. या निधीकरिता जे मदत करू इच्छितात त्यांना संबंधित मुलांच्या नावे थेट पैसे पाठविण्याची तरतूदही योजनेत आहे.
‘या योजनेतून मदतीपेक्षाही खचलेल्या तरूणांच्या मनात हिंमत आणि आत्मविश्वास निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. कारण, हे वर्ष कसेतरी ढकलण्यात विद्यार्थ्यांना यश आले आहे. पण, खरे आव्हान तर पुढे आहे. सुदैवाने पाऊस वेळेवर पडला तरी दुष्काळाची छाया विरळ व्हायला ऑगस्ट-सप्टेंबर उजाडेल. तोपर्यंत मुलांना या भत्त्यातून आपले महाविद्यालयाचे शुल्क, पुस्तके, कपडे, चप्पल आदी साहित्य घेण्यापुरते पैसे हातात आले तरी खूप झाले,’ असे कपिल पाटील यांनी हिंमत भत्त्याची कल्पना मांडताना सांगितले.
 इच्छुकांची मदत स्टुडंट्स रिलीफ फंड या नावाने युनियन बँकेच्या ३१५७०१०१०३३१०२० या खाते क्रमांकावर स्वीकारली जाईल. संपर्क – शिक्षक भारती, पोयबावडी म्यु. स्कूल, केईएम रूग्णालयासमोर, परळ-१२. दूरध्वनी – २४१५०५७६