मुंबई-पुणे रेल्वे प्रवासाची शान असलेली डेक्कन क्वीन उद्या ८३ व्या वर्षांत पदार्पण करीत आहे. यानिमित्त पुण्यामध्ये ८३ किलो वजनाचा केक बनविण्यात आला आहे. शनिवारी सकाळी ७.०० वाजता गाडीचे मुंबईकडे प्रस्थान होण्यापूर्वी हा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे.
देशभरात सुमारे १९ हजार गाडय़ा वर्षांनुवर्षे धावत आहेत. मात्र रेल्वेच्या इतिहासात प्रवाशांकडून वाढदिवस साजरा होणारी डेक्कन क्वीन ही एकमेव गाडी आहे. शनिवारी, १ जून रोजी या गाडीच्या प्रवासाला ८२ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त रेल्वे प्रवासी ग्रूपच्या अध्यक्ष हर्षां शहा यांनी ८३ किलो वजनाचा केक बनवून घेतला असून त्यावर डेक्कन क्वीनचे चित्र आहेच; पण त्याच दिवशी १०२ वर्षे पूर्ण करणाऱ्या मुंबई-फिरोजपूर मेलचेही चित्र रेखाटण्यात आले आहे. १० फूट लांब व पाच फूट रुंदीचा चौकोनी आकाराचा हा केक आहे. गाडीच्या वाढदिवसानिमित्त आकुर्डी येथील वॉल्टझ म्युझिक अकादमीचे २०० विद्यार्थी नृत्य, गायन सादर करणार आहेत.