कोल्हापूर विमानतळास छत्रपती राजाराम महाराजांचे नाव देण्यास राज्य शासनाने ठराव करून तो विमानतळ प्राधिकरणाकडे पाठविण्याचा निर्णय घेतल्याबद्दल येथील छत्रपती राजाराममहाराज प्रेमींकडून शुक्रवारी आनंदोत्सव साजरा करण्यात आला.   
विमानतळास राजाराममहाराजांचे नाव देण्यासाठी गेले १० वर्षे सातत्याने प्रशासनाशी पाठपुरावा केला आहे. तसेच गेली ३ वर्षे उपोषणही केले जात आहे. या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे उदयसिंह राजेयादव, अॅड. प्रताप जाधव, दिलीप टोणपे, वसंत सिंघण, विजय जाधव, आदित्य मैंदर्गीकर, बाळासाहेब निकम, ज्ञानेश पोतदार आदी राजारामप्रेमींनी छत्रपती राजाराममहाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून दोन दिवसांपूर्वी उपोषण केले होते. या उपोषणाची तात्काळ दखल घेत राज्य शासनाने गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोल्हापूर विमानतळ हे भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या विमानतळाला छत्रपती राजाराममहाराज यांचे नाव देण्याचा ठराव संमत करून हे नाव विमानतळ प्राधिकरणाकडे पाठविण्याचेही बैठकीत ठरले.    
या निर्णयाप्रीत्यार्थ छत्रपती राजाराममहाराजप्रेमींनी व्हीनस कॉर्नर येथील छत्रपती राजाराममहाराजांच्या पुतळय़ास पुष्पहार अर्पण करून जनतेला साखरपेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. याप्रसंगी माजी महापौर विलासराव सासने म्हणाले, उदयसिंह राजेयादव आणि त्यांचे सहकारी गेली १० वर्षे नामकरणासाठी अथक संघर्ष सुरू ठेवला होता. यामध्ये विविध तालीम संघटना, सामाजिक संघटना, प्रसारमाध्यमे यांनी यास पाठबळ दिले. त्यामुळे कोल्हापूरच्या अस्मितेचा प्रश्न असलेला प्रश्न मार्गी लागल्याने मी महाराष्ट्र शासनाच्या अभिनंदनाचा ठराव करीत आहे. या वेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, श्रीकांत घाटगे, सुनीलकुमार सरनाईक, महादेव पाटील, बाबासाहेब पाटील, बाबासाहेब पोवार, नगरसेवक रविकिरण इंगवले आदींसह नागरिक उपस्थित होते.