माळीवाडा देवस्थान व महालक्ष्मी मंदिर यांच्यातील वाद आता धूमसू लागला आहे. महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वारावरील अतिक्रमण असलेली लोखंडी कमान काढल्यानंतर ती पुन्हा बसवल्याबद्दल महालक्ष्मी मंदिराशी संबंधितांवर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन माळीवाडा देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांना दिले.
देवस्थानचे अध्यक्ष अभय आगरकर, तसेच सर्वश्री पंडीत खरपुडे, बाळासाहेब बोराटे, अशोक कानडे, माणिक विधाते, सुरेश आंबेकर, राजू औसरकर आदींनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली व त्यांना निवेदन दिले. पोपट साठे, श्रीकांत साठे, मनेष साठे व अन्य काही व्यक्ती गैरकायद्याची मंडळी जमवून जातीयवाद निर्माण करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
महालक्ष्मी मंदिराची जागा माळीवाडा देवस्थानची आहे. तशी कायदेशीर नोंद सरकारदप्तरी, तसेच माळीवाडा देवस्थानकडेही आहे. या मंदिराच्या आवारात गणपतीचा रथ ठेवण्यात येतो. त्याला अडथळा होईल अशा पद्धतीने लोखंडी कमान लावल्याबद्दल संबंधितांच्या विरोधात पोलिसांकडे लेखी तक्रार केली होती. त्यासंदर्भात त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
त्यानंतर गुरूवारी माळीवाडा देवस्थानने पोलीस बंदोबस्तात ती अतिक्रमण असलेली लोखंडी कमान काढली. गणपतीचा रथ नेहमीच्या जागेवर ठेवला. त्यानंतर पुन्हा पोपट, श्रीकांत व मनेष साठे यांनी अनाधिकाराने गैरकायद्याची मंडळी जमवून ती कमान रात्रीच्या सुमारास लावली. हे कृत्य बेजबाबदारपणाचे असून त्यातून जातीय वाद उकरून काढण्याचा हेतू दिसत आहे, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, असे आगरकर व शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले.