उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेढा येथील जाहीर कार्यक्रमात ‘कुठाय तो पऱ्हाड’ असे वक्तव्य केल्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अजित पवारांचा जाहीर निषेध करताना, भिंत रेटत नाही म्हणून कुडाला लाथा घालू नका, अशी टीका संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
अजित पवार यांनी कराड येथे आत्मक्लेश करून घेतला होता. तरी असे उर्मट व मस्तीखोर वक्तव्य करण्याचे धाडस त्यांनी केले आहे. याचा सरळ अर्थ त्यांना सत्तेची मस्ती आहे. परंतू मी म्हणतो की, मुख्यमंत्री पृथ्वीराजबाबा यांचेजवळ रेटत नाही व काही चालत नाही म्हणून हे महाशय अधिकाऱ्यावर राग काढत आहेत. उपजिल्हाधिकारी पऱ्हाडसाहेब हे कर्तबगार अधिकारी आहेत. कामानिमित्त त्यांचा संबंध आला तेव्हा तत्परतेने जनतेची कामे करताना आम्ही पाहिलेले आहे. अशा अधिकाऱ्यास एकेरी भाषेत उल्लेख करणे अजित पवारांना शोभत नाही. त्यांनी खरोखर आत्मक्लेश करून घेतला असेल, तर मोठेपणाने केल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी, अशी मागणी सातारा जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.