वरोरा नाका चौकातील उड्डाणपुलाचे बांधकाम कासवगतीने सुरू असल्यानेच अपघातात वाढ झाली आहे. त्यामुळेच निर्दोष विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला. या पुलाचे काम तातडीने पूर्ण करावे व कंत्राटदाराविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी शिवसेना, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस, भाजप व मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.    
शुक्रवारी येथे झालेल्या अपघाताचे पडसाद उमटले. शिवसेना राष्ट्रवादी युवक काँग्रेस, मनसे आणि जनता महाविद्यालयाने रास्ता रोखो आंदोलन केले. गेल्या कित्येक दिवसांपासून पुलाचे काम सुरू आहे. ते अद्याप पूर्ण न झाल्याने अपघाताच्या घटणा सातत्याने घडत असल्याचा आरोप करण्यात आला. शुक्रवारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोरील हुतात्मा स्मारक परिसरात ट्रकने दुचाकीला घडक दिली. यात अक्षय गेडाम आणि महेश सहारे या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. यातील एक विद्यार्थी जनता महाविद्यालयातील होता. या महाविद्यालयात शनिवारी शोकसभा घेण्यात येऊन सुटी देण्यात आली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग व वाहतूक विभाग विभागास निवेदने देण्यात आली. त्यात पुलाच्या अर्धवट कामाने अपघाताच्या घटना सातत्याने घडत असल्याचा आरोप प्राध्यापकांनी केला. शिष्टमंडळात प्राचार्य डॉ. एम. सुभाष, प्रा जुगलकिशोर सोमानी, प्रा कमलाकर धानोरकर, प्रा. योगेश दुधपचारे, प्रा आशीष महातळे, प्रा. आशीष महातळे, प्रा किशोर ठाकरे यांचा समावेश होता.
शिवसेनेनेही येथे आंदोलन केले. उपमहापौर संदीप आवारी, संदीप गिऱ्हे, राहुल बेले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. मनसेचे संदीप सिडाम, शैलेश केळकर यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अमीत उमरे यांच्या नेतृत्वाखाली वरोरा नाका चौकात निदर्शने करण्यात आली. गेल्या दोन वर्षांंपासून या पुलाचे काम रेंगाळत आहे. यामुळेच वरोरा नाका चौकात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तेलंग आणि मुख्य वाहतूक निरीक्षक पुंडलिक सपकाळे यांना निवेदन देण्यात आले. या चौकात आतापर्यंत ३० ते ४० निष्पाप लोकांचे नाहक बळी गेले आहेत. या पाश्र्वभूमीवर भविष्यात अशाप्रकारचे र्दुदैवी अपघात घडू नयेत, यासाठी नव्या पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. मात्र, ते कासव गतीने सुरू आहे. यामुळे दोन दिवसापूर्वीच दोन युवकांचा मृत्यू झाला. हे काम करणाऱ्या संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करून त्याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी खासदार हंसराज अहिर यांनी केली आहे.
या पुलाच्या बांधकामास होणारा विलंब आता पुन्हा एकदा लोकांच्या जिविताला धोका निर्माण करणारा ठरत आहे. काही महिन्यापूर्वी येथील डॉ. दुबे यांच्या मातोश्रीला अपघातात जीव गमवावा लागला.
वाढत्या अपघातांची दखल घेऊन या पुलाचे युध्दपातळीवर बांधकाम होणे गरजेचे आहे. मात्र, संबंधित कंत्राटदार व बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकरी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत आहेत. वाहतूक खोळंबू नये यासाठी एकेरी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय या अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणाचा कळसच असल्याचे खासदार अहिर यांनी म्हटले आहे.