कोल्हापूर शहरातील जनता टोलच्या विरोधात आक्रमकपणे रस्त्यावर उतरली आहे. अशा स्थितीत कामगारमंत्री हसन मुश्रीफ व गृहराज्यमंत्री सतेज पाटील या जिल्ह्य़ातील दोन्ही मंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा ते जनतेच्या बाजूचे नसल्याचे समजून त्यांच्या विरोधात जनआंदोलन छेडण्यात येईल. तसेच टोल विरोधात महामोर्चा, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन या प्रकारची आंदोलनही छेडण्यात येणार आहे, अशी माहिती खासदार राजू शेट्टी व ज्येष्ठ नेते गोविंदराव पानसरे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली.     
टोलविरोधी कृती समितीच्या वतीने बुधवारी सायंकाळी शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. बैठकीवेळी खासदार शेट्टी, कॉ.पानसरे, आमदार चंद्रकांतदादा पाटील, आमदार राजेश क्षीसागर, आमदार डॉ.सुजित मिणचेकर, आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार बजरंग देसाई, धनंजय महाडिक यांनी टोलविरोधातील आक्रमक भूमिका मांडली. यानंतर टोलविरोधातील आंदोलनाची माहिती पत्रकारांना देण्यात आली.     
खासदार शेट्टी म्हणाले, आयआरबी कंपनीने टोल आकारणी करण्याची जय्यत तयारी केली आहे. तर राज्य शासन या कंपनीच्या पाठिशी आहे. जनतेला वेठीस धरून राज्यकर्त्यांची बांडगुळे पोसण्यासाठी टोल आकारणी केली जात आहे. कोल्हापूर जिल्ह्य़ातील जनतेचा टोल आकारणीस प्रचंड विरोध आहे. तो मोडून काढण्यासाठी कितीही पोलीस बंदोबस्त मागितला, तरी त्याची पर्वा न करता भर पावसातही आंदोलन करण्याची तयारी आहे. खासदार सदाशिवराव मंडलिक टोल आकारणीचा प्रयत्न झाल्यास त्याला विरोध दर्शविण्यासाठी टोल नाक्यांजवळ खुर्ची टाकून बसण्याचे ठरविले आहे. तर मी त्यांच्या शेजारी मांडी घालून बसून टोलला विरोध करणार आहे.    
कॉ.पानसरे म्हणाले, कोल्हापूर शासनाची दडपशाही नवी नाही. टोल वसुलीच्या माध्यमातून सुरू होणाऱ्या दडपशाहीच्या विरोधात दोन हात करण्यासाठी जनताही सज्ज आहे. टोलला विरोध दर्शविण्यासाठी महामोर्चा काढण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व शासकीय कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन केले जाणार आहे. हे आंदोलन इतके तीव्र असेल, की जिल्हाधिकाऱ्यांनाही त्यांच्या कार्यालयात जाणे मुश्किल होईल.
प्रतीक पाटीलही आंदोलनात
कोल्हापूर शहरातून टोल आकारणीसाठी जोरदार विरोध होत असून जिल्ह्य़ातील दोन खासदार, पाच आमदार यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी उघडपणे लढा उभारला आहे. आता या आंदोलनामध्ये केंद्रीय कोळसा राज्यमंत्री व शेजारच्या सांगली जिल्ह्य़ाचे खासदार प्रतीक पाटील यांनीही उडी घेतली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पाठविलेल्या निवेदनामध्ये प्रतीक पाटील यांनी टोल आकारणीबाबत जनभावना तीव्र असल्याने सर्वसमावेशक बैठक घेऊन तोडगा काढावा, अन्यथा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे. टोलच्या प्रश्नामुळे पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करताना लोकांच्या नाराजीला सामोरे जावे लागणार आहे, असा इशारा त्यांनी या पत्रात दिला आहे.