मेघवाळ पंचायतीची पालकमंत्र्यांकडे धाव
महानगरपालिकेने सुरू केलेली ठेकेदारी पध्दत बंद करावी या मागणीसाठी नाशिक मेघवाळ पंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन विविध मागण्या मांडल्या. या मागण्यांसंदर्भात शासन आणि महापालिकेचे प्रतिनिधी यांच्यात बैठक घडवून आणण्यात येईल, असे आश्वासन भुजबळ यांनी दिले.
राज्य व केंद्र शासन, महानगर पालिका यांच्याकडे मेघवाळ, मेहतर, बाल्मिकी समाज व सफाई कामगारांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. कामगारांना न्याय मिळावा म्हणून शासन तसेच संबंधित महानगरपालिकेकडे वेळोवेळी निवेदन देऊनही कोणतीच कार्यवाही झालेली नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. मेघवाळ, मेहतर, बाल्मिकी समाज संघर्ष समितीतर्फे सुरेश मारु, रामकिशन चव्हाण, अनिल बेग यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पालकमंत्र्यांसमवेत बैठक घेऊन समाजाला तसेच सफाई कामगारांना न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात आली.
मागील सिंहस्थात शासनाने सफाई कामगार भरतीचे आदेश दिले असतानाही पालिकेने भरती न करता ठेकेदारी पद्धतीनेच कामे करून या समाजावर अन्याय केला होता. पुढील वर्षी सिंहस्थ कुंभमेळा भरणार आहे. त्यासाठी शासन आदेशानुसार सफाई कामगारांची भरती करून त्यात वंशपरंपरेनुसार सफाई करणाऱ्या मेघवाळ, मेहतर, बाल्मिकी समाजातील लोकांना सामावून घेण्यात यावे, या प्रक्रियेत ठेकेदारी पद्धतीचा अवलंब न करण्याचे आदेश द्यावे, शिक्षित कामगारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदोन्नती देऊन या समाजातील युवा बेरोजगारांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, राज्य सफाई कर्मचारी आयोग पुन्हा तयार करावा, यासह इतर अनेक मागण्यांसंदर्भात पालकमंत्र्यांशी बैठकीत चर्चा झाली. या मागण्या त्वरित सोडविण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.