सिनेमाच्या जगात सोहळे रोजचेच! पण १ जुलैच्या रात्री इस्कॉन मंदिरात रंगलेला सोहळा वेगळाच होता. तो नेहमीसारखे फिल्मी मुखवटे घालून फिरणाऱ्यांचा नव्हता. रमेश आणि सीमा या देव दाम्पत्याच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस साजरा झाला तोही पुन्हा एकदा लग्नगाठी बांधूनच.. पन्नास वर्षांनी पुन्हा एकदा मध्ये धरलेल्या अंतरपाट आणि त्याच्या अल्याड-पल्याड असणाऱ्या त्या दोघा पती-पत्नीच्या मनात अवघे सहजीवन सिनेमाच्या रिळांसारखे सरसर फिरत होते. त्यांच्या आजूबाजूलाही काही जुन्या आठवणी, काहीसा भावूकपणा, काही कौतूकभरल्या तर काही डोळ्यांच्या कडा ओलावलेल्या नजरा आणि पाहुण्यांनी गजबजलेला तो लग्नमंडप..पन्नासाव्या वर्षी पुन्हा रंगलेला ‘देवां’चा लग्नसोहळा हा असा होता.
रमेश आणि सीमा या देवदाम्पत्याने एकोणीस मराठी आणि हिंदी चित्रपटांतून पती-पत्नीची भूमिका साकारली. १ जुलै १९६३ रोजी कोल्हापुरात त्यांचे खरे लग्न झाले होते. त्यानंतरची पडद्यावरची एकोणीस आणि स्वत:च्याच मुलांनी आंतरपाट धरून उभे केले तो देवांचा आजचा एकविसावा लग्नसोहळा ठरला. खऱ्या लग्नाच्या वेळी नियोजित छायाचित्रकार येऊ न शकल्याने देव कुटुंबियांच्या संग्रही त्या क्षणाची जेमतेम तीन छायाचित्रे आहेत. लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवशी मात्र छायाचित्रकार आणि वाहिन्यांच्या कॅ मेऱ्याने होणाऱ्या लखलखाटाला आवर घाला, असे आवाहन वारंवार करावे लागले. अजिंक्य आणि अभिनय या दोन मुलांनी आई-वडिलांच्या मध्ये आंतरपाट धरला. मंगलाष्टके म्हटली गेली. अक्षता टाकल्या गेल्या. रमेश देव यांनी त्यावेळी लग्नात घेतलेला उखाणा पुन्हा तितक्याच खणखणीतपणे घेतला आणि त्या क्षणासाठी का होईला झालेल्या लग्नघरातील हा सोहळा उत्तरोत्तर रंगत गेला.
या सोहळ्याला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते देव दाम्पत्याच्या छायाचित्रांच्या विशेष पुस्तिकेचे प्रकाशन केले. त्यांच्याच उपस्थितीत वाढदिवसाचा केक कापण्यात आला. आज छोटय़ा-छोटय़ा कारणांनी होणाऱ्या घटस्फोटांच्या जगात पन्नास वर्ष आनंदाने एकत्रित नांदणारे हे जोडपे आदर्श म्हणायला हवे, असे म्हणत आश्चर्य व्यक्त करणाऱ्या ड्रीमगर्ल हेमामालिनीसह अनिल कपूर, जॅकी श्रॉफ व मराठीतील अनेक मान्यवर मंडळी या सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहिली होती.