मलकापूर नगरपंचातीने नियोजनबद्ध राबविलेल्या २४ बाय ७ नळपाणीपुरवठा योजनेस क्लस्टर इनोव्हेशन सेंटर दिल्ली युनिव्हर्सिटी पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन योजनेची पाहणी केली.  महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या सहकार्याने तांत्रिक सल्ला घेऊन शहरासाठी राबविलेल्या या योजनेस पंतप्रधान पुरस्काराने सन्मानित केले आहे. मलकापूर २४ बाय ७ पाणी योजना ही अतिशय कल्पकतेने राबविलेली असून या योजनेचे माध्यमातून नगरपंचायतीने पाणी, ऊर्जा बचत करून पर्यावरणसंवर्धन केले आहे.
अभ्यासदौऱ्यानिमित्त क्लस्टर इनोव्हेशन सेंटरचे रचना शर्मा (इनोव्हेशन इंजिनिअर अँड मॅनेजमेंट), प्राध्यापक अभिजित परगार, निकिता गर्ग, लतिशा कट्टर, श्रेया, अमन ठाकूर, मयूर जैन, मयांक अरोरा, संतोषी, विकास, चंदायणी के, अक्षक खेराल आदींची उपस्थिती होती.
या योजनेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला असून, इतर स्थानिक स्वराज्य संस्थांना दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधी व प्रशासन तसेच लोकसहभागातून साकारलेली ही पथदर्शी योजना इतर स्थानिक स्वराज्य संस्थांतील पदाधिकारी आणि मलकापूरमधील नागरिकांसाठी आदर्शवत आहे.
२४ बाय ७ नळपाणीपुरवठा योजनेच्या पहाणीच्यावेळी मलकापूर नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष तथा पाणीपुरवठा समिती सभापती मनोहर शिंदे यांनी क्लस्टर इनोव्हेशन सेंटर दिल्ली युनिव्हर्सिटी पदाधिकाऱ्यांचे  स्वागत केले.
यावेळी शिक्षण सभापती प्रकाश बागल, मुख्याधिकारी हेमंत निकम, जल अभियंता ए. पी. मोहिते, वरिष्ठ लिपिक ज्ञानदेव साळुंखे तसेच पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि संपूर्ण सेवकवर्ग उपस्थित होता.