आपल्या प्रभागातील अतिक्रमणे पाडून काढण्याच्या कारवाईच्या पाश्र्वभूमीवर महापालिकेच्या अधिकाऱ्याला बेदम मारहाण केल्याप्रकरणी संबंधित मारेकऱ्यांविरूध्द पोलिसात गुन्हा दाखल होत असताना जखमी अधिकाऱ्यांविरूध्द देखील महिलेचा विनयभंग करून जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यास चिथावणी दिली व बेकायदा जमाव जमवून जमावबंदीचा आदेश मोडल्याप्रकरणी उपमहापौर हारून सय्यद यांच्यासह काँग्रेसचे नगरसेवक चेतन नरोटे व राष्ट्रवादीचे गटनेते दिलीप कोल्हे यांच्याविरूध्द फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत पोलीस हवालदार दादासाहेब सरवदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नगरसेवक चेतन नरोटे व दिलीप कोल्हे तसेच उपमहापौर हारून सय्यद यांच्यासह १५ जणांच्या जमावाने फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या आवारात येऊन पालिकेच्या अधिकाऱ्यांविरूध्द महिलेचा विनयभंग केला व जबरी चोरी केल्याची तक्रार दाखल करा म्हणून चिथावणी दिली. नगरसेवक दिलीप कोल्हे यांच्या प्रभागात वाढलेली अतिक्रमणे पाडण्याची कारवाई करून महापालिकेतील सहायक अभियंता विजय जोशी हे परतत असताना वाटेत भैय्या चौकात त्यांना अडवून बेदम मारहाण झाली. नंतर जोशी हे पोलिसात फिर्याद दाखल करण्यासाठी गेले असताना पाठोपाठ नगरसेवक चेतन नरोटे, दिलीप कोल्हे व उपमहापौर सय्यद हे समर्थकांसह पोलीस ठाण्यात आले. अधिकाऱ्यांविरोधातही तक्रार घ्या म्हणून गोंधळ घातला. यात जमावबंदी आदेशाचा भंग झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.