गेल्या दोन दिवसांपासून महाबळेश्वरमध्ये थंडीचा कडाका वाढला असून वेण्णालेकवर नौकाविहारासाठी बांधलेल्या जेटींवर दवबिंदू गोठून हिमकण तयार झालेले दिसत होते. यंदाच्या मोसमात प्रथमच हिमकण पाहायला मिळाले. हवामान खात्याच्या नोंदीनुसार गुरुवारी महाबळेश्वर येथे १३.३ अंश सेल्सियस व शुक्रवारी १४.४ अंश सेल्सियस इतके तापमान होते. वेण्णालेक परिसरात मात्र तापमान आणखी कमी होते.
यावर्षी दिवाळीत महाबळेश्वरमध्ये एक-दोन दिवस सोडले तर थंडी फारशी पडली नव्हती.  दरम्यान गेल्या दोन दिवसांत शहरी भागात तापमान १४.४ अंश सेल्सियस दाखवले गेले तरी वेण्णालेक परिसरात जेटी प्लॅटफॉर्मवर दवबिंदू गोठले होते व त्याचे हिमकणात रूपांतर  महाबळेश्वर येथे स्ट्रॉबेरी व राजबेरी या मधुर फळांच्या बागा तसेच मुळा, गाजर व नवलकोल सारख्या भाज्यांच्या बागा वेण्णालेक परिसरात आहेत. या बागांच्या जमिनीत सतत पाणी मुरलेले असते. थंडीच्या दिवसात अनेकदा येथील तापमान ० ते ३ अंश सेल्सियसपर्यंत खाली गेल्याने तेथे दवबिंदू गोठतात. हिमकणाचे हे सौंदर्य साधारण २ ते ३ कि.मी परिसरात दृष्टीस पडते. त्यामुळे महाबळेश्वरमधील वेण्णालेकवर पर्यटकांची जास्त गर्दी होत असते.