कुष्ठरोगाच्या निर्मूलनासाठी सातत्याने जनजागृती केली जात असली तरी नागरिक हा रोग बळावल्याशिवाय उपचारांसाठी पुढे येत नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
पुण्यात डिसेंबपर्यंत कुष्ठरोगाचे एकूण ५७२ रुग्ण सापडले आहेत. विशेष म्हणजे यातील ४१५ रुग्ण ‘एमबी’ (मल्टिबॅसिलरी) अर्थात संसर्गजन्य अवस्थेतील कुष्ठरोगाचे आहेत, तर १५७ रुग्ण ‘पीबी’ (पॉझिबॅसिलरी) अर्थात रोगाच्या असंसर्गजन्य अवस्थेतील आहेत. ‘आरोग्य सेवा (कुष्ठरोग)’ चे सहायक संचालक डॉ. प्रकाश पाटील यांनी ही माहिती दिली आहे.
पर्यवेक्षकीय नागरी कुष्ठरोग पथकाचे नॉन मेडिकल सुपरवायझर डॉ. चंद्रशन गिरी म्हणाले, ‘‘कुष्ठरोगाच्या रुग्णांनी उपचार घेण्यास स्वत:हून पुढे न येणे ही मोठी समस्या आहे. स्थानिक नागरिकांपेक्षा स्थलांतरित कामगार वर्गात कुष्ठरोगाचे प्रमाण अधिक आढळत असल्याचा अनुभव आहे. झारखंड, बिहार, कर्नाटक या राज्यांत कुष्ठरोगाचे दरहजारी प्रमाण अधिक आहे. त्यामुळे या राज्यांतून येणाऱ्या कामगारांमध्ये कुष्ठरोगाचे काही रुग्ण सापडतात. या रुग्णांचे राहण्याचे ठिकाण कायम नसल्याने त्यांना शोधून उपचार करण्यात अडचणी येतात. पूर्वी या रोगासाठी राबविण्यात येणाऱ्या व्हर्टिकल कृती कार्यक्रमाचे सर्वसाधारण आरोग्य सेवेत विलीनीकरण झाले.
यामुळे कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमात सहभागी असणारी अनेक पदे २००० सालानंतर नव्याने भरली गेली नाहीत. परिणामी
या कार्यक्रमासाठी जिल्हा पातळीवर कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवते.’’ कुष्ठरोगाबाबत जनजागृतीसाठी काम करणाऱ्या ‘सेवाधाम’ या सामाजिक संस्थेच्या नॉन मेडिकल सुपरवायझर नूरजहाँ तांबोळी म्हणाल्या, ‘‘कुष्ठरोगाच्या रुग्णांना लक्षणे दिसत असूनही घरची मंडळी आपल्याला स्वीकारतील का, कामाच्या ठिकाणी लोक काय म्हणतील अशा भीतीने रुग्ण उपचार घेण्यास पुढे येत नाहीत. बहुसंख्य रुग्ण आजार बळावून अवयवात बधिरपणा किंवा विकृती दिसू लागल्यानंतरच उपचारांसाठी येतात.’’
संग्रहित लेख, दिनांक 30th Jan 2013 रोजी प्रकाशित
रोग बळावल्याशिवाय उपचार घ्यायची मानसिकता नाही!
कुष्ठरोगाच्या निर्मूलनासाठी सातत्याने जनजागृती केली जात असली तरी नागरिक हा रोग बळावल्याशिवाय उपचारांसाठी पुढे येत नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
First published on: 30-01-2013 at 01:14 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dieases will rise then treatment is taken this psychological