वित्त क्षेत्रातील विविध अभ्यासक्रमांसाठी आयसीआयसीआय डायरेक्ट सेंटर फॉर फायनान्शिअल लर्निगने (आयसीएफएल) आयडिअल एज्युकेशन प्रा. लि. सह एडय़ु विस्टा एंटरप्रायझेस यांच्याशी धोरणात्मक सहकार्य केले आहे. या सहकार्यानंतर विद्यार्थ्यांना आता वित्त नियोजन, संपत्ती व्यवस्थापन, शेअर मार्केट अशा वित्त क्षेत्रातील विविध विषयांवर अभ्यास करता येणार आहे.
हे सर्व अभ्यासक्रम मुंबईतील मुख्य डिजिटल वर्गातून आयडिअल एज्युकेशनच्या ७० ठिकाणी उपग्रह सुविधा असलेल्या वर्गांमध्ये शिकविले जाणार आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षकांशी थेट संवादही साधता येणार आहे. आयडियल एज्युकेशनने गेल्या दोन दशकांमध्ये दोन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण दिले आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. वालावलकर यांनी दिली. वित्त क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रमाणपत्राला विद्यार्थ्यांची मोठी मागणी आहे, हे पाहता आयसीआयसीआय डायरेक्टसोबत झालेले हे सहकार्य खूप उपयुक्त असेल असेही ते म्हणाले. विद्यार्थ्यांना सोपे आणि दर्जात्मक शिक्षण देणे हे ‘आयसीएफएल’चे मुख्य ध्येय असल्याचे ‘आयसीएफएल’ आणि आयसीआयसीआय सिक्युरिटीजचे मुख्य नीरज जोशी यांनी स्पष्ट केले. यामुळे आयडियलसोबतचे हे सहकार्य आम्हाला छोटय़ा शहरांपर्यंत पोहोचण्यास मदत करेल. यामुळे वित्त साक्षरतेचे आमचे उद्दीष्टही साध्य होईल असेही जोशी म्हणाले. या सहकार्यातून आम्ही ‘सर्टिफाइड फायनान्शिअन प्लानर्स’ तयार करणार आहोत. या प्रमाणपत्रधारकांमुळे वित्त क्षेत्रातील मार्गदर्शकांची मोठी पोकळी भरून निघेल असेही ते म्हणाले.
विविध व्यवसायात काम करणारे विद्यार्थी विविध ठिकाणांवरून प्रशिक्षित केले जाणार असून त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रमाणपत्र मिळणार आहे.
कोणत्याही वित्तीय संस्थेने देऊ केलेला अशाप्रकारचा हा पहिलाच अभ्यासक्रम आहे. यामध्ये ई-लर्निग आणि वेबटोरिअल्स या अभिनव प्रयोगांचाही समावेश होणार आहे.