सोलापूर जिल्हा परिषदेच्या कारभारात राष्ट्रवादीच्याच, परंतु दुसऱ्या फळीच्या सदस्यांनी दुष्काळी परिस्थितीवर सुचवलेले उपाय ऐकूनही घेतले जात नाहीत. जिल्हा परिषद अध्यक्षांऐवजी इतरच सदस्य उत्तरे देतात व त्यामुळे सत्ताधारी गटाच्या सदस्यांनाही सभात्याग करावा लागत असल्याने या दुसऱ्या फळीच्या सदस्यांना सापत्नभावाची वागणूक मिळत असल्याची भावना वाढीस लागल्याचे दिसत आहे.
जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीच्याच दुसऱ्या फळीतील सदस्यांनी सांगितले, की कायमस्वरूपी दुष्काळी असणाऱ्या या जिल्हा परिषद सभागृहात दुष्काळावरील प्रश्नांना गौण स्थान दिसते. दुष्काळात लोकांना पिण्यासाठी टँकर्सने पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र ते पाणी साठवण्यासाठी टाक्या पुरवाव्यात व त्यासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद करावी अशी मागणी सदस्य धैर्यशील मोहिते पाटील यांनी गेल्या वर्षी केली होती. त्यावर या वर्षी तशी तरतूद झाली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या विश्रामगृहांची दुरुस्ती तसेच नवीन विश्रामगृहे बांधणे आदी कामांसाठी कोटय़वधी रुपयांची तरतूद केली आहे. प्रत्यक्षात ही कामे दुष्काळानंतर केल्याने काही फरक पडणार नाही. त्याऐवजी एकाच दलित वस्ती सुधारणेसाठी सलग दुसऱ्या वर्षी आर्थिक तरतूद करता येत नसल्याने अनेक दलित वस्त्यांमधील विकासकामे अध्र्यावर राहतात. पुन्हा निधी येईपर्यंत त्याची किंमत व गरजही वाढलेली असते, तसेच अनेक गावांतील गावठाणातील लोकवस्ती सातत्याने वाढत राहते, परंतु तत्कालीन लोकवस्ती विचारात घेऊन केलेल्या पाणीपुरवठा योजना पुढे तोकडय़ा पडू लागल्या आहेत. त्यासाठी भले राज्य शासनाच्या ग्रामीण स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाचा निधी असेलही. परंतु त्याची मागणी पाठपुरावा, वेगवेगळय़ा स्तरांवरील मंजुरी व त्यानंतर अंमलबजावणी यामध्ये जाणारा वेळ पाहता जोपर्यंत त्या लोकांना परिस्थितीबरोबर झुंजावेच लागणार, त्यामुळे अशा अनावश्यक बाबींवर खर्च करावा लागणारा निधी समाजकल्याण खात्याकडे वर्ग करून दलित वस्ती सुधारणा व ग्रामीण पाणीपुरवठा विभागासाठी वापरावी, तसेच या अर्थसंकल्पात पंढरपूर, शिंगणापूर यांसारख्या यात्रा, त्यासाठी टी.सी.एल. पावडर खरेदी आदी कामांसाठी आर्थिक तरतूद केली असली तरी ती रक्कम कमी आहे. त्यामुळे अनावश्यक खर्च थांबवून तो निधी इकडे वळवावा. अशा धैर्यशील मोहिते पाटील यांना मांडलेल्या प्रश्नांवर चर्चाच झाली नाही. या प्रश्नांना जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. निशिगंधा माळी यांनी उत्तरे देण्याऐवजी उपाध्यक्ष सुभाष गुळवे, सभापती शिवाजी कांबळे हेच उत्तरे देऊ लागल्याने अखेर जिल्हा परिषद अध्यक्ष कोण आहेत, असा प्रश्न पडलेल्या मोहिते पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तशी विचारणा केली व जिल्हा परिषदेला महिला अध्यक्ष लाभल्या असताना त्यांच्या उत्तरे देण्यावर हक्कावर इतर सदस्य गदा आणत असल्याची तक्रार केली. तरीदेखील या मुद्यांवर चर्चाच न झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्याच असणाऱ्या धैर्यशील मोहिते पाटील यांना सभात्याग करावा लागला. राष्ट्रवादीच्याच ताब्यात असलेल्या जिल्हा परिषद सभागृहात त्यांच्याच सदस्यांना प्रश्न मांडण्यास मोकळीक नसल्याचे यातून उघड होत आहे. शिवाय विकासाऐवजी श्रेय लाटल्याचे राजकारण होत असल्याचे दिसत आहे.