टँकर, छावण्या, विहिरींच्या नोंदी रडारवर’
‘दुष्काळ आवडे सर्वाना’ हे दुष्काळी कामांना चिकटलेले ब्रीद खरे ठरू नये, म्हणून बीडचे जिल्हाधिकारी सुनील केंद्रे यांनी चारा छावण्या व टँकर तपासणीचा धडाका लावला आहे. दुसरीकडे विभागीय प्रशासनानेही अधिग्रहित विहिरींच्या नोंदी तपासण्याचे आदेश उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. प्रशासनाने अनागोंदीला लावलेला हा चाप प्रशंसनीय असला, तरी बीड जिल्हय़ातील काही लोकप्रतिनिधी मात्र अधिकाऱ्यांच्या तक्रारी करू लागले आहेत.
जानेवारी महिन्यात टँकरच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. विंधन विहिरींचे अधिग्रहणही वाढत आहे. सर्वाधिक विंधन विहिरी उस्मानाबाद जिल्हय़ात आहेत. मराठवाडय़ात जेवढय़ा विंधन विहिरी अधिग्रहित केल्या आहेत, त्याच्या ६८ टक्के विंधन विहिरी एकटय़ा उस्मानाबाद जिल्हय़ात आहेत. अधिग्रहित केलेली विहिरींची संख्या योग्य आहे की नाही, याची तपासणी करण्याचे आदेश विभागीय प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. दुसरीकडे बीडमध्ये तपासणीचा धडाका सुरू आहे. चारा डेपोच्या माध्यमातून वाळलेल्या पेंढीसाठी ४० रुपये दर निश्चित करण्यात आला होता. बीडचे जिल्हाधिकारी केंद्रेकर यांनी ठेकेदारांशी चर्चा करून ३३ रुपयांपर्यंत तो खाली आणला. त्यामुळे सव्वा कोटी रुपये वाचले.
चारा डेपो व छावण्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावल्याने घोटाळे करणे अवघड होऊन बसले आहे. चारा पुरविणाऱ्या मालमोटारींचे वजन व इतर अनेक प्रशासकीय बाबींच्या तपासण्या सुरू झाल्यानंतर लोकप्रतिनिधी वैतागले. चारा छावण्यांच्या बाबतीतही तपासण्या करण्यात आल्या. कोणते जनावर किती शेण देते, त्याची किंमत काय, याचे शासकीय अध्यादेश पुन:पुन्हा तपासण्यात आले. शेणाचा दर ठरवून चारा छावणी चालविणाऱ्या देयकांमधून ती रक्कम वजा करण्यात आली. तसेच जनावरांच्या कानाला बिल्ले न लावणाऱ्यांना दहा टक्के दंड आकारण्यात आला. परिणामी, ‘दुष्काळ आवडे सर्वाना’ याला चाप बसला!
उस्मानाबाद जिल्हय़ात मात्र अशा प्रकारची तपासणी झाली किंवा नाही, याचे अहवाल विभागीय स्तरावर देण्यात आले नाही. विहिरींना पाणी आहे आणि अधिग्रहित केलेली संख्या योग्य आहे, असा अहवाल कळविला गेला. औरंगाबादमध्येही गेल्या वर्षी विहिरींचे अधिग्रहण करताना घोटाळे झाले होते. त्याची तपासणी करा, असे आदेशही पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले होते. पुढे त्या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही. आता पुन्हा विहीर अधिग्रहणांच्या नोंदी तपासल्या जात आहेत. तलाठी, मंडल अधिकारी व तहसीलदारांच्या स्तरावर दररोज छावण्यांमधील जनावरांची मोजणी व्हावी व अन्य छावणी चालविण्याच्या अनुषंगाने दिलेल्या सूचनांचे पालन व्हावे, असेही कळविण्यात आले आहे.
बीड व उस्मानाबाद जिल्हय़ांत चारा छावण्या आहेत. बीड जिल्हय़ात सात ठिकाणी, तर उस्मानाबाद जिल्हय़ात दोन ठिकाणी सुरू असणाऱ्या चारा छावण्यांमध्ये १८ हजार ९१८ जनावरे आहेत. त्यातील १६ हजार ३२४ जनावरे मोठी असून, त्यांना लागणाऱ्या चाऱ्याचे दर राज्य सरकारने नुकतेच कमी केले आहे.
रेल्वेने पाणी आणण्याचा प्रस्ताव बारगळण्याची चिन्हे
उस्मानाबाद शहराला पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी रेल्वे वाघिणीने पाणी आणण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी राज्यस्तरावर पाठविला होता. मात्र, या प्रस्तावावर कोणीच गांभीर्याने विचार केला नाही. रेल्वेच्या वाघिणीत पाणी भरण्यासाठी दिला जाणारा वेळ व पाणी उतरवून घेण्यासाठी दिला जाणारा वेळ खूप कमी असल्याने रेल्वेने पाणी आणण्याचा प्रस्ताव बारगळण्याची चिन्हे असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, उजनीमधून पाणी आणण्यासाठी प्रस्तावित केलेल्या योजनेला रक्कम मिळाली असल्याने येत्या काही दिवसांत ही योजना पूर्ण करून उस्मानाबाद शहराला पाणीपुरवठा होईल, असे सांगितले जाते. मात्र, उस्मानाबाद व जालना या दोन्ही शहरांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवणार आहे.