पदोन्नतीच्या मागणीसाठी जिल्ह्य़ातील तलाठय़ांनी प्रशासकीय कामावर बहिष्कार घातला. बुधवारी जिल्हा तलाठी संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले.
जिल्ह्य़ात मंडळ अधिकाऱ्यांची २८ पदे रिक्त असतानाही जिल्हा प्रसासनाच्या वतीने तलाठी संवर्गातून मंडळ अधिकारी पदावर पदोन्नती थांबविण्यात आली. रिक्त पदावर ज्या कर्मचाऱ्यांची सेवा १२ वर्षे पूर्ण झाली आहे अशा तलाठय़ांना नियुक्त करावे, असे सरकारचे स्पष्ट आदेश असताना जिल्हा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करीत जिल्ह्य़ातील सर्वच तलाठी व मंडळ अधिकारी ३१ डिसेंबरला सामूहिक रजेवर गेले होते. तेव्हापासून या तलाठय़ांनी प्रशासकीय कामावर बहिष्कार घातला. बुधवारी जिल्हा तलाठी संघाच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. उद्याही (गुरूवार) हे आंदोलन सुरूच राहणार आहे. मागणी मान्य न केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला. संघाचे अध्यक्ष मुरलीधर दादेवाड, सरचिटणीस संजय काकडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या आंदोलनात मोठय़ा संख्येने जिल्ह्य़ातील तलाठी सहभागी झाले.