गिरणा व नागासाक्या मात्र जेमतेम
पावसाचा जोर बराच कमी झाला असला तरी ऑगस्टच्या पहिल्या पंधरवडय़ातच जिल्ह्यातील पाच प्रकल्प ओसंडून वाहत असून १३ प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहेत. उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठय़ा गिरणाबरोबर तिसगाव, नागासाक्या या तीन प्रकल्पांची स्थिती जेमतेम असल्याचे लक्षात येते. सोमवारी दारणा धरणातून ४१८४, भावली ४८१, कडवा ७१७, वालदेवी ५९९ आणि नांदुरमध्यमेश्वरमधून ४७६९ क्युसेक्स पाणी सोडण्यात आले.
दुष्काळाच्या गर्तेत सापडलेल्या उत्तर महाराष्ट्रास यंदाचा पावसाळा सुखावणारा ठरला. हंगामाच्या सुरुवातीला दाखल झालेल्या पावसाने पुढील काळात काही तालुक्यांचा अपवाद वगळता इतर चार ते पाच तालुक्यांत सातत्य कायम ठेवले. त्याची परिणती ऑगस्टच्या मध्यावरच तीन धरणे वगळता उर्वरित सर्वच धरणात समाधानकारक जलसाठा झाला आहे. सोमवारी बहुतांश भागातून पाऊस अंतर्धान झाला होता. संपूर्ण जिल्ह्यात मागील चोवीस तासात केवळ १२०.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यात इगतपुरी ४२, दिंडोरी २५.२, पेठ २१, त्र्यंबकेश्वर १०, चांदवड १.४, कळवण ३.२, सुरगाणा ७ आणि निफाड ९.८ मिलीमीटर या तालुक्यांचा समावेश आहे. मालेगाव, नांदगाव, बागलाण, देवळा, सिन्नर व येवला हे पाच तालुके या दिवशी पूर्णपणे कोरडे राहिले.
आतापर्यंत झालेल्या पावसामुळे कधी नव्हे ते यंदाच्या हंगामात धरणांमध्ये जलदगतीने जलसाठा झाला. जिल्ह्यातील धरणांचा आढावा घेतल्यास २३ पैकी पाच धरणे पूर्णपणे भरलेली आहेत तर जवळपास १३ धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. उर्वरित तीन धरणांमध्ये निम्म्याच्या आसपास जलसाठा झाला असला तरी उर्वरित तीन धरणे अद्याप दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसते. पालखेड ७५०, भावली १४३४, वालदेवी ११३३, आळंदी ९७०, हरणबारी ११६६ दशलक्ष घनफूट ही पूर्ण भरलेल्या धरणांची यादी. त्यापाठोपाठ गंगापूर ४८६५ दशलक्ष घनफूट (८६ टक्के), काश्यपी ११९३ (६४), गौतमी गोदावरी १३४१ (७१), करंजवण ३७६१ (७०), वाघाड २३६८ (९५), पुणेगाव ५३० (८०), दारणा ५६२८ (७९), नांदूरमध्यमेश्वर २२५ (८८), कडवा १३३० (७१), भोजापूर २८७ (८०), चणकापूर १९८९ (७३), केळझर ४४७ (७८) ही धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. ओझरखेड ४४१ (२१), पुनद ७८२ (५६), नागासाक्या २० (५), गिरणा २०८९ (११)या धरणांमध्ये जेमतेम साठा असून तिसगाव तर पूर्णपणे कोरडे आहे. जिल्ह्यातील धरणांची एकूण क्षमता ६६ हजार ३५४ असून आतापर्यंत ३६, ५०२ दशलक्ष घनफूट (५५ टक्के) जलसाठा झाला आहे. गतवर्षी हेच प्रमाण २४,६०२ दशलक्ष घनफूट म्हणजे ३७ टक्के होते. यावरून गतवर्षीच्या तुलनेत १८ टक्के जलसाठा अधिक असल्याचे दिसून येते.

वार्षिक सरासरी गाठण्याच्या दिशेने वाटचाल
ऑगस्टच्या मध्यांवरच जिल्ह्यातील पर्यन्यमानाची टक्केवारी ७३ टक्क्यांवर पोहोचली असून वार्षिक सरासरी गाठण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरू आहे. संपूर्ण जिल्ह्यात आतापर्यंत ११,२२४ मिलीमीटर पाऊस झाला. गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण चार हजार मिलीमीटरने अधिक आहे. जिल्ह्याची वार्षिक पर्जन्यमान सरासरी १५, २०० मिलीमीटर पावसाची आहे. आतापर्यंत झालेला पाऊस पाहता ही सरासरी नेहमीच्या तुलनेत आधीच गाठली जाऊ शकते. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस इगतपुरी तालुक्यात २७६३ मिलीमीटर तर येवला तालुक्यात सर्वात कमी म्हणजे केवळ २४१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. नाशिक ४६०, दिंडोरी ६२९, पेठ १६९६, त्र्यंबकेश्वर १५५६, मालेगाव ३९९, नांदगाव ३१४, नांदगाव २७७, कळवण ३८४, बालगाण ३९६, सुरगाणा ११८०, देवळा २९१, निफाड ३१६, सिन्नर ३१८ असा पाऊस झालेला आहे.