क्रीडा क्षेत्रात अनेक खेळाडू घडविणाऱ्या गडचिरोली मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या जिल्हा प्रेक्षागार मैदानाचा विकास लालफितशाहीमुळे रखडलेला आहे. त्यामुळे या प्रेक्षागार मैदानाच्या विकासाकरिता शासनाने संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश द्यावेत, अशी अपेक्षा जिल्ह्य़ातील खेळाडू तसेच क्रीडाप्रेमी व्यक्त करीत आहेत.
१९८२ मध्ये गडचिरोली जिल्ह्य़ाची निर्मिती झाल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी रत्नाकर गायकवाड यांच्या संकल्पनेतूनच गडचिरोली शहरानजीकच्या लांझेडा येथे क्रीडांगण तयार करण्यात आले; परंतु वनविभागाने सदर जागा वनविभागाची असल्याचा दावा केल्याने जिल्हा प्रेक्षागार मैदानाचा विकास रखडला. त्यानंतर क्रीडाप्रेमींच्या पाठपुराव्यानंतर जिल्हाधिकारी निरंजनकुमार सुधांशू यांनी आपल्या कार्यकाळात क्रीडा विकासाला चालना दिली. सुधांशू यांच्या पुढाकारातून स्टेडियमच्या वनप्रस्तावाची फाईल भोपाळला पाठविण्यात आली.
वन विभागाला पर्यायी वनजमीनही उपलब्ध करून देण्यात आली तरी पण या जिल्हा प्रेक्षागार मैदानाचा विकास लालफितशाहीत रखडला आहे. जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी अद्ययावत प्रेक्षागार मैदान असावे याकरिता स्थानिक लोकप्रतिनिधींनी राज्य शासनाकडे आग्रही मागणी करावी, अशी अपेक्षा जिल्ह्य़ातील तमाम  क्रीडापटूंनी केली आहे.