गोसे अर्थ-वाणिज्य महाविद्यालयात विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे ‘जागतिक परिप्रेक्ष्यात विमा क्षेत्रातील नावीन्य’ असा विषय घेऊन राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले. उद्घाटन बजाज फिनसर्व लिमिटेडचे रणजित गुप्ता यांनी केले. अध्यक्षस्थानी वर्धेच्या शिक्षण मंडळाचे संजय भार्गव होते. प्राचार्य डॉ. एन.वाय. खंडाईत यांनी प्रास्ताविक केले. महाविद्यालयाची परंपरा, विकास, शैक्षणिक घडामोडी आणि अभ्यासक्रमासंबंधीची संक्षिप्त माहिती खंडाईत यांनी यावेळी दिली. संजय भार्गव यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात चालू घडामोडीचे सूक्ष्म अवलोकन करण्यात यावे, हेच शैक्षणिक कार्यक्रमांचे औचित्य असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण आणि औद्योगिक क्षेत्राचा एकत्रित विचार केल्याशिवाय आपण योग्य निर्णय घेऊ शकत नाही. औद्योगिक क्षेत्र ज्ञान आणि अनुभवावर आधारित असते आणि ज्ञान व अनुभवावर आधारित व्यवस्था सक्रिय नागरिकांची निर्मिती करते, असा विश्वास भार्गव यांनी व्यक्त केला. उद्घाटक गुप्ता यांनी अमेरिकेतील आरोग्य विम्याच्या क्षेत्रात झालेल्या परिवर्तनावर प्रकाश टाकला. तसेच भारतीय आरोग्य विमा क्षेत्राची माहितीही त्यांनी यावेळी दिली. विमा क्षेत्रातील विकासासाठी त्यांनी अनेक सूचना केल्या आणि विम्याच्या क्षेत्रातील परदेशी गुंतवणुकीवरही त्यांनी प्रकाश टाकला. विमा क्षेत्र, विमा योजना, प्रत्यक्ष परदेशी गुंतवणूक(एफडीआय) आणि जागतिकीकरणाच्या संदर्भात त्यांनी सूक्ष्म माहिती दिली. प्रश्नोत्तरांच्या रूपाने त्यांनी विमा क्षेत्राची माहिती दिली. यावेळी स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाचे अधिष्ठाता डॉ. भरत मेघे विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. चर्चासत्रात या विषयावर आधारित पेपर वाचन झाले. त्याची समीक्षा तज्ज्ञ डॉ. एस.डी. पागे आणि बजाज अलाइंज जनरल इन्शुरन्स लिमिटेडचे मुख्य व्यवस्थापक व्ही. जयरामन उपस्थित होते. समारोपाच्या कार्यक्रमात नागपूर विद्यापीठाच्या व्यवसाय व्यवस्थापनाचे विभाग प्रमुख डॉ. विनायक देशपांडे यांनी वैश्विकरणाच्या संदर्भात विम्याच्या क्षेत्रातील आव्हानांवर प्रकाश टाकला. प्र-कुलगुरू डॉ. महेश येंकी यांनी विम्याच्या नवीन पैलूंची माहिती दिली. प्राचार्य खंडाईत व संयोजक डॉ. पी.एम. पराडकर यांचे या चर्चासत्राला सहकार्य लाभले.