घर ही मुलांची पहिली शाळा असते यामुळे पालकांनी घरातच जबाबदारी आणि विधायकतेचा संस्कार रुजवणे गरजेचे असते. मुलांच्या शैक्षणिक जीवनात चांगल्या गुणांच्या अपेक्षा ठेवा पण तुला पहिला क्रमांकच मिळाला पाहिजे, या मागण्यांचे ओझे लादू नका. आयुष्यात एकच परीक्षा नसून अनेक परीक्षा द्यायच्या आहेत याकडे खिलाडीवृत्तीने पाहायला आपल्या पाल्याला शिकवा, असे आवाहन प्रा.डॉ.कमला हर्डीकर यांनी केले.
पेठ वडगाव येथील ब्राह्मण समाज संघाच्या वतीने आयोजित शारदीय ज्ञानसत्र व्याख्यानमालेमध्ये ‘पालकत्व-आजचे आव्हान’ या विषयावर त्या बोलत होत्या. या वेळी प्रमुख उपस्थित ब्राह्मण समाज संघाचे अध्यक्ष सुरेशदादा देवस्थळी, उपाध्यक्ष रमेशचंद्र जोशी, अॅड.विवेक कमलाकर आदी होते.
प्रा.हर्डीकर म्हणाल्या, स्त्री-पुरुष समानता घरातून सुरू झाली पाहिजे, मुलगा उनाड फिरतो परंतु मुलीलाच कामाला जुंपले जाते असेच चित्र आज पाहायला मिळत आहे. मुलीला घरी यायला उशीर झाला म्हणून आपण ओरडतो पण मुलाला घरी यायला उशीर झाल्यावर पालक रागवत नाहीत. स्त्री-पुरुष समानता नुसते बोलून येत नाही. ती घराघरात रुजविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. या व्याख्यानमालेस ब्राह्मण समाज संघाचे संचालक दत्ता सपाटे, प्रा.वसंतराव जोशी, वासुदेव अंबपकर, अजित पराडकर, धनंजय बुवा, अॅड.समीर मुंगळे, राघवेंद्र भट्ट, डॉ.सचिन जोशे उपस्थित होते.