मुंबईमध्ये अस्वच्छता करणाऱ्या पाळीव श्वानांची विष्ठा श्वानमालकांनी साफ करून ती महापालिकेच्या कचराकुंडीत टाकण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात येत असून, श्वान विष्ठा सफाईमध्ये टाळाटाळ करणाऱ्या मालकावर दंडात्मक कारवाई करण्याचा विचार प्रशासन करीत आहे. दंडाची रक्कम अद्याप निश्चित झाली नसली तरी ती मालकाच्या कायम स्मरणात राहावी इतकी मोठी असेल, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचबरोबर श्वान संस्थांना विभाग दत्तक देऊन त्यांच्यावर भटक्या श्वानांच्या विष्ठेच्या सफाईची जबाबदारी सोपविण्याचा विचार प्रशासन करीत आहे.
दररोज सकाळी आणि संध्याकाळी समुद्रकिनारे, उद्याने, मैदाने आदी सार्वजनिक ठिकाणी पाळीव श्वान आणि त्याच्या मालकांची भ्रमंती सुरू असते. दिवसभर घरात कोंडलेल्या श्वानाला नैसर्गिक विधी करता यावेत आणि थोडा मोकळा श्वास घेता यावा, असा मालकांचा या भ्रमंतीमागचा उद्देश असतो. रस्त्यावरून जाताना मध्ये पदपथांवर हे श्वान विष्ठा करतात. तसेच वाहनालगत अथवा भिंतीशेजारीच लघुशंका उरकतात. अस्वच्छता करीत श्वान फिरत असतात. विदेशामध्ये रस्त्यावर श्वानाने विष्ठा केल्यावर मालक तात्काळ ती साफ करताना दिसतात, परंतु मुंबई आणि अन्य शहरांमध्ये हा प्रकार अभावानेच दिसतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत अभियाना’ची घोषणा केल्यानंतर प्रशासनाने पालिका कार्यालयांपासूनच स्वच्छतेला सुरुवात केली आहे. आता पदपथांवर कचरा करणाऱ्यांना चांगली अद्दल घडविण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. पदपथ अस्वच्छ करण्यामध्ये पाळीव आणि भटक्या श्वानांचाही समावेश आहे. त्यामुळे श्वानमालकांवरच स्वच्छतेची जबाबदारी सोपविण्याची कल्पना पुढे आली आहे. फेरफटका मारण्यासाठी श्वानाला नेताना त्याने विष्ठा केली तर साफसफाई करण्यासाठी आवश्यक त्या वस्तू मालकाने अथवा त्याला फिरावयास नेणाऱ्या व्यक्तीने सोबत न्याव्यात. म्हणजे स्वच्छता राखता येईल. यासाठी लवकरच जनजागृती अभियान राबविण्याचा पालिकेचा मानस आहे, मात्र जनजागृतीनंतरही श्वानाने केलेल्या अस्वच्छतेकडे कानाडोळा करून निघून जाणाऱ्या मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे पालिकेच्या कार्यकारी वैद्यकीय अधिकारी पद्मजा केसकर यांनी सांगितले.
श्वानमालकांवर करण्यात येणाऱ्या दंडाची रक्कम अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही, परंतु अस्वच्छतेकडे कानाडोळा करण्याच्या प्रवृत्तीला आळा बसावा म्हणून मोठय़ा रकमेचा दंड मालकांवर करण्यात येईल. त्यामुळे दंडात्मक शिक्षा कायमची स्मरणात राहील आणि भविष्यात श्वानमालक स्वच्छतेकडे काळजीपूर्वक लक्ष देतील, असेही पद्मजा केसकर म्हणाल्या.
भटक्या श्वानांमुळेही मोठय़ा प्रमाणावर अस्वच्छता होत असून त्याच्या सफाईसाठी श्वान संस्थांची मदत घेण्याचा पालिकेचा विचार आहे. मुंबईतील विभाग श्वान संस्थांना दत्तक म्हणून देण्यात येणार आहेत. दत्तक दिलेल्या परिसरात भटक्या श्वानांनी केलेल्या विष्ठेची सफाई करण्याची जबाबदारी या संस्थांवर सोपविण्यात येईल, असे त्या म्हणाल्या.
मुंबईत अस्वच्छता करणाऱ्यांना पकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे काम पालिकेचे उपद्रवशोधक करीत असतात. श्वान विष्ठेची स्वच्छता श्वानमालक अथवा विभाग दत्तक म्हणून दिलेली संस्था योग्य पद्धतीने करीत आहे की नाही, यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी उपद्रवशोधकांवर सोपविण्याचा विचार वरिष्ठ पातळीवर सुरू आहे, असे पद्मजा केसकर यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dog owners will fine for dirtiness
First published on: 05-12-2014 at 02:30 IST