फायनान्स कंपनीत दामदुप्पट ठेव योजनेचे आमिष दाखवून सामान्य मध्यमवर्गीय ठेवीदारांना ९० लाखांना गंडविल्याप्रकरणी सहाजणांविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
यासंदर्भात अरुण मसा डुकरे या फसलेल्या ठेवीदाराने दिलेल्या फिर्यादीनुसार गणेश आनंद टकले, आनंद टकले, मनोज टकले, योगेश टकले, अश्विनी टकले व मैलार देवकते यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. या सर्वानी मिळून विजापूर रस्त्यावरील नव्या आरटीओ कार्यालयाजवळ सिद्धेश्वरनगरात फायनान्स सेल्युसन्स या नावाची फर्म स्थापित केली होती. या फर्ममध्ये शेअर ट्रेडिंगची गुंतवणूक केल्यास दामदुप्पट रक्कम देऊ आणि जास्तीत जास्त परतावे मिळवून देण्याचे आमिष दाखविण्यात आले. त्यावर विश्वास ठेवून अरुण डुकरे यांच्यासह अनेक गुंतवणूकदारांनी ठेवी गुंतवल्या. परंतु अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलिसात धाव घेण्यात आली. विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास रामगुडे हे पुढील तपास करीत आहेत.