पश्चिम विदर्भात गेल्या वर्षीपेक्षा यंदा पाणीटंचाईची तीव्रता वाढली असून सध्या ५६ गावे आणि वाडय़ांमध्ये ६५ टँकर्सच्या सहाय्याने पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. सर्वाधिक २४ टँकर्स वाशीम जिल्ह्यात फिरत आहेत. धरणांमधील जलसाठा देखील झपाटय़ाने कमी होत चालला आहे. सध्या मोठय़ा, मध्यम आणि लघू प्रकल्पांमध्ये २४ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे.
गेल्या वर्षी याच कालावधीत अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये १९ गावांमध्ये पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी २५ टँकर्सचा वापर करावा लागला होता, पण यंदा परिस्थिती गंभीर आहे. वाशीम जिल्ह्यातील सर्वाधिक २१ गावे टँकरग्रस्त असून यवतमाळ जिल्ह्यामध्ये १४, बुलढाणा जिल्ह्यातील ११, अमरावती जिल्ह्यातील ७ आणि अकोला जिल्ह्यातील एका गावात टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पाणी पुरवण्यासाठी पुरेशा प्रमाणात टँकर देखील सरकारी यंत्रणांकडे उपलब्ध नाहीत. ज्या टँकर्सचा वापर करण्यात येत आहे, त्यातील २२ टँकर्स हे शासकीय, तर तब्बल ४३ टँकर्स हे खासगी आहेत. कंत्राटदारांचे हीत यातून चांगल्या पद्धतीने साधले जात आहे. गेल्या वर्षी याच काळात अमरावती जिल्ह्यातील ८, वाशीम जिल्ह्यात ३, बुलढाणा जिल्ह्यात १०, तर यवतमाळ जिल्ह्यातील ४ गावांमध्ये टँकरने पिण्याचे पाणी पुरवण्यात येत होते. यंदा अशा गावांची संख्या दुपटीहून अधिक वाढली आहे.
अमरावती विभागातील सर्व धरणांमध्ये २४ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. अनेक लघु प्रकल्पांनी तळ गाठला आहे. विभागातील ९ मोठय़ा प्रकल्पांमध्ये सध्या २९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यात अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा प्रकल्पात ३१ टक्के, यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्पात १२ टक्के, अरुणावतीमध्ये १७ टक्के, बेंबळा प्रकल्पात ६१ टक्के, अकोला येथील काटेपूर्णा प्रकल्पात ११ टक्के, वान प्रकल्पात ४८ टक्के, बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात १८ टक्के, पेनटाकळीत २१ टक्के, खडकपूर्णा प्रकल्पात २५ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत मोठय़ा प्रकल्पांमध्ये ४१ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. तो यंदा निम्म्यापर्यंत खाली आला आहे. विभागातील मध्यम प्रकल्पांमध्ये २८ टक्केच पाणीसाठा आहे. अमरावती जिल्ह्यातील शहानूर प्रकल्पात ५२ टक्के, चंद्रभागा प्रकल्पात ६१ टक्के, पूर्णा प्रकल्पात ५२ टक्के आणि सापन प्रकल्पात ६५ टक्के पाणीसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूसमध्ये ३१ टक्के, सायखेडा ९ टक्के, गोकी २१ टक्के, वाघाडी २८ टक्के, बोरगाव ३१ टक्के, नवरगाव २० टक्के पाणीसाठा आहे. विभागातील लघु प्रकल्पांमध्ये १५ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे.