शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून दिला जाणारा ‘ई-महाराष्ट्र’ पुरस्कार सोलापूर विद्यापीठाला प्राप्त झाला आहे. अतिशय मर्यादित कालावधीत नावारूपाला येत असलेल्या सोलापूर विद्यापीठाने आणखी एका क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्था, विद्यापीठे, महाविद्यालयांकडून नामांकने मागविण्यात आली होती. सोलापूर विद्यापीठाने ‘डिजिटल युनव्हर्सिटी’ या प्रकल्पास अनुसरून ‘बेस्ट टेक्नॉलॉजी प्रॅक्टिसेस इन हायर एज्युकेशन’ या संवर्गातून ‘ई-महाराष्ट्र’ पुरस्कारासाठी मानांकन पाठविले होते. त्याची दखल घेत माहिती व तंत्रज्ञान विभागाने या पुरस्कारासाठी सोलापूर विद्यापीठाची निवड केली. माहिती व तंत्रज्ञान विभागाचे सचिव राजेश अग्रवाल यांच्या हस्ते  सोलापूर विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. डी. जे. साळुंखे यांनी स्वीकारला.
विद्यार्थी केंद्रबिंदू मानून सोलापूर विद्यापीठाने महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या (एमकेसीएल) सहकार्याने गेल्या सात वर्षांपासून ‘डिजिटल युनिव्हर्सिटी’ व ‘डिजिटल कॉलेज’ हे प्रकल्प यशस्वीपणे राबविले आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रवेश घेतल्यापासून ते त्यांच्या परीक्षा गुणपत्रिकेपर्यंतची सर्व आवश्यक माहिती एसएमएसद्वारे व त्यांच्या स्वतंत्र लॉगइनद्वारे उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांची व पालकांची मोठी सोय होते. या पुरस्काराबद्दल कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांनी प्रशासनाचे अभिनंदन केले.