अपंगांच्या सवलतीचा लाभ घेणाऱ्या जिल्हा परिषदेकडील बोगस अपंग कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांमार्फत सर्वच कर्मचाऱ्यांसाठी फेरतपासणी शिबिर आयोजित करण्याचा निर्णय कास्ट्राईब कर्मचारी महासंघ व जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. कारभारी खरात यांच्या चर्चेत घेण्यात आला.
कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत प्रश्नांसाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. महासंघाचे जिल्हाध्यक्ष के. के. जाधव, जिल्हा सरचिटणीस सुहास धिवर, श्रीमती पारखे, शकुंतला सुर्वे, शाम थोरात आदी उपस्थित होते. प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिकांची ३५४ नवीन पदे व आरोग्य सेवकांची २२५ नवीन पदे भरली जाणार आहेत, त्यामध्ये एनआरएचएमकडील कंत्राटी परिचारिकांना प्राधान्य देण्याचे ठरले.
कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करुनही सोसायटी व विम्याचे हप्ते तीन, तीन महिने भरले जात नाहीत, त्याच्या व्याजाचा भुर्दंड कर्मचाऱ्यांना सहन करावा लागतो, त्यासाठी संबंधितांवर कारवाई करुन भुर्दंड वसूल करण्याचे ठरले.
जिल्ह्य़ात ४७ प्राथमिक आरोग्य केंद्रे उभारण्यासाठी ५१ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, तेथे सुविधा उपलब्ध करण्यासाठीही १० कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत, असे सांगताना डॉ. खरात यांनी केंद्रात राष्ट्रीय महापुरुषांच्या प्रतिमा लावण्याचे मान्य केले. कर्मचाऱ्यांची निवासस्थाने राहण्यालायक नाहीत, स्वच्छतागृहे निकामी आहेत, याकडेही महासंघाने लक्ष वेधले.