पिंपरी जलसेन येथे मजुरांऐवजी जेसीबीच्या सहाय्याने रोजगार हमीचे काम उरकण्याचा प्रताप सरपंचाने केल्याची तक्रार तेथील मजुरांनी सभापती सुदाम पवार यांच्याकडे केली आहे. संबंधित कामाची अधिकाऱ्यांसह पाहणी करून दोषींवर कारवाईचे आदेश सभापती पवार यांनी दिले आहेत. दरम्यान, सरपंचाचे एजंट म्हणून काम पाहणाऱ्या मुकादमांकडून महिला मजुरांना शिवीगाळ, तसेच दमदाटीही करण्यात येत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
पिंपरी जलसेन येथे रोजगार हमी योजनेंतर्गत मावलाई मंदिर ते घाटापर्यंतच्या रस्त्याचे काम मंजूर झाले आहे. हे काम मजुरांकडून करून घेणे बंधनकारक असताना सरपंच लहू थोरात यांनी परस्पर जेसीबी यंत्राने ते पूर्ण करण्यास प्रारंभ केला़  गुरूवारी मजूर कामावर गेले असता मुकादमाने जेसीबीने पूर्ण करण्यात आलेल्या कामावरच काम करण्याचे आदेश सरपंचांनी दिल्याचे सांगितले. मात्र, त्यास ग्रामसेवक, तसेच रोजगार सेवकाने आक्षेप घेतल्याने मजुरांना काम न मिळाल्याने घरी परतावे लागले. दरम्यान, सरपंचाच्या आदेशानुसार मजुरांकडून गावातील सफाई करून घेण्यात आली या कामाच्या पगाराबाबतही गोंधळाचे वातावरण आहे. कारण हे काम केले त्यावेळी हजेरी पुस्तकावर मजुरांच्या सह्य़ा घेण्यात आल्या नाहीत. गेल्या दोन महिन्यांपासून मजुरांना पगारही मिळाले नसल्याची तक्रार करण्यात आली. सरपंचाच्या मनमानीस कंटाळलेल्या मजुरांनी आज संघटितपणे पारनेर येथे सभापती सुदाम पवार यांच्याकडे आपली कैफियत मांडली. तक्रार करणाऱ्या मजुरांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. सभापती पवार यांनी या कामाची पाहणी करून कारवाई करावी, तसेच मजुरांना त्वरित काम उपलब्ध करून रखडलेले पगार मिळावेत, अशी मागणी करण्यात आली.