स्थायी समितीच्या आठ सदस्यांची निवृत्ती ३० जानेवारी रोजी होणार असून समितीच्या बाहेर कोण पडणार, याचा निर्णय चिठ्ठय़ा टाकून होणार असल्यामुळे या सोडतीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
स्थायी समितीच्या बैठकांमध्ये सध्या सन २०१३-१४ या आर्थिक वर्षांचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू आहे. मात्र, सोळा सदस्यांच्या या स्थायी समितीमधील आठ सदस्य पुढील बुधवारी (३० जानेवारी) निवृत्त होणार आहेत. नवी महापालिका अस्तित्वात आल्यानंतर स्थायी समितीवर सोळा सदस्यांची निवड प्रत्येक पक्षाच्या संख्याबळानुसार केली जाते. या समितीतील आठ जण पहिल्या वर्षांच्या अखेर निवृत्त केले जातात. सोळापैकी कोण आठ जण निवृत्त होणार याचा निर्णय चिठ्ठय़ा टाकून केला जातो.
ज्यांच्या नावाची चिठ्ठी निघते असे आठजण निवृत्त झाल्यानंतर ज्या पक्षांचे आठ जण निवृत्त झाले, त्याच पक्षाच्या तेवढय़ा सदस्यांना स्थायी समितीवर जाण्याची संधी दिली जाते. त्यामुळे स्थायी समितीमधील संख्याबळ स्थिरच राहते. महापालिका स्थायी समितीमध्ये राष्ट्रवादीचे सहा, काँग्रेस, मनसे आणि भाजपचे प्रत्येकी तीन आणि शिवसेनेचा एक असे सदस्य आहेत. यापैकी ज्या पक्षाचे सदस्य निवृत्त होतील, त्या पक्षाचे नवे सदस्य स्थायी समितीमध्ये जातील.
स्थायी समितीच्या अध्यक्षपदाबाबतही आता पालिका वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. पुढील वर्षांचे अध्यक्षपदही राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहणार असून पक्ष कोणाला संधी देणार त्याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत.