लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजल्यानंतर त्या वेळी जिल्ह्यात असलेल्या समस्यांचे स्वरूप आता पूर्णपणे बदलले असून शेतकरी आणि शेतीचे झालेले नुकसान हाच आता प्रचाराचा मुद्दा राहणार आहे. त्यामुळेच उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवारांसह सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना आपले लक्ष ग्रामीण भागाकडे वळविणे भाग पडले आहे. त्यातच दुपापर्यंत कडक ऊन आणि नंतर पावसाळ्यासारखे वातावरण राहत असल्याने ज्यांना सातत्याने अशा वातावरणात फिरण्याची सवय नाही. त्या उमेदवारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या नाकीनऊ येऊ लागले आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, महायुती, आम आदमी, तिसरी आघाडी आणि बहुजन समाज पक्ष अशी पंचरंगी लढत होणार आहे. तर दिंडोरी मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, महायुती आणि तिसरी आघाडी यांच्यात लढत आहे. निवडणूक जाहीर झाली. तेव्हा सर्वच पक्षांच्या प्रचाराच्या पटलावर असणारे मुद्दे आता पाऊस आणि गारपीट यामुळे मागे पडले आहेत. काही जणांनी विकासकामांना तर काही उमेदवारांनी बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यास, तर कोणी भ्रष्टाचाराविरोधात आघाडी उघडण्यास प्राधान्य देण्याचे ठरविले होते. या मुद्दय़ांनुसार उमेदवारी जाहीर झालेल्या आणि ज्यांना उमेदवारी मिळू शकेल अशा उमेदवारांनी प्रचारही सुरू केला होता. परंतु आठ ते दहा दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या पाऊस आणि गारपीट यामुळे सर्वानाच आपल्या मुद्दय़ांना काही प्रमाणात वेसण घालावे लागत असल्याचे दिसते. पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांची दैना उडाली असताना त्यांच्याकडे मत मागण्यासाठी जावे तरी कसे, हीच मुख्य समस्या प्रत्येक उमेदवारासमोर उभी राहिली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात आपण निवडून आल्यावर हे करू किंवा ते करू असे सध्या कोणताही उमेदवार सांगताना दिसत नाही.
दु:खात बुडालेल्या शेतकऱ्यांचे सांत्वन करण्याचे कामच उमेदवार आणि राजकीय पक्षांना करावे लागत आहे. त्यातच आचारसंहिता आडवी येत असल्याने थेट कोणतीही मदत देता येत नसल्याने उमेदवारांची अधिकच गोची झाली आहे. काही उमेदवारांनी नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या गाठीभेटी हा एकमेव कार्यक्रम सध्या राबविला आहे. ज्यांना उन्हातान्हात फिरण्याची सवय नाही. अशा उमेदवारांची बदलत्या वातावरणामुळे चांगलीच फरफट होत असून शेतकरी कुटुंबाची औपचारिक भेट घेऊन शक्य तितका वेळ आपल्या वातानुकूलीन आरामदायक वाहनांमध्ये काढण्याची रणनीती काही उमेदवारांनी आखली आहे. दुसरीकडे ग्रामीण भागाशी कायमचा संबंध असलेल्या उमेदवारांच्या फिरस्तीवर बदलत्या वातावरणाचा कोणताही परिणाम झालेला नाही. शेतकऱ्यांसमवेत अधिक बैठक असलेल्या उमेदवारांना गारपिटीमुळे झालेले नुकसान आणि कुटुंबावर ओढवलेले संकट याची क्षणार्धात जाणीव होत असल्याने असे उमेदवार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची सहानुभूती मिळविण्यात यशस्वी होत आहेत.