लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी शहरातील वेगवेगळ्या भागातील रस्ते अडवून चौकसभा घेण्याचा सपाटा लावला असून त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडीत आणखी भर पडू लागल्याचे चित्र पाहावयास मिळते. त्यात ऐन संध्याकाळी सभा घेतल्या जात असल्याने शहरातील रस्ते ठप्प होऊ लागले असून त्यामुळे कामावरून घरी परतणाऱ्या अनेकांना या वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत आहे. एकंदरीतच मताचा जोगवा मागण्यासाठी सभा घेण्यात येत असल्या तरी वाहतूककोंडीमुळे या सभा मतदारांसाठी डोकेदुखी ठरू लागल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्य़ातील ठाणे, कल्याण, भिवंडी तसेच पालघर या चारही मतदार संघात लोकसभेची निवडणूक होत असून त्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रीय तसेच राज्यपातळीवरील नेत्यांच्या सभा घेण्यात येत आहेत. राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवरील नेत्यांच्या सभा शहरातील मोठय़ा मैदानांवर होतात. याशिवाय राज्यातील दुसऱ्या फळीतील नेते आणि स्थानिक नेत्यांच्या वॉर्ड पातळीवर चौक सभा घेण्यात येत असून या सभांसाठी शहरातील वेगवेगळ्या भागातील रस्ते अडविण्यात येत असल्याचे चित्र आहे. या चौक सभांसाठी संपूर्ण रस्ता अडवून त्या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येते. असे असले तरी पर्यायी मार्गावर वाहनांचा ताण वाढल्यामुळे वाहतूक ठप्प होत असल्याचे दिसून येते. शहरात दिवसेंदिवस वाहनांच्या संख्येत वाढ होऊ लागली असून त्या तुलनेत शहरातील बहुतेक रस्ते अरुंद आहेत. त्यामुळे या अरुंद रस्त्यांवर वाहतूक कोंडी आता नित्याची झाली आहे. असे असतानाच रस्ता अडवून चौक सभा घेण्यात येत असल्यामुळे शहरातील वाहतूक कोंडीत आणखी भर पडू लागली आहे. ठाणे, कल्याण, भिवंडी या तिन्ही मतदारसंघांतील शहरी भागात अशा प्रकारचे चित्र मोठय़ा प्रमाणात दिसून येत असून या सभांमुळे वाहतूक कोंडीत अडकलेले अनेकजण राजकीय पक्षांच्या नावाने बोटे मोडत आहेत.  
नोकरदारांची वाट अडविणाऱ्या सभा
ऐन सायंकाळच्या वेळेत सर्वच राजकीय पक्षांकडून चौक सभा घेण्यात येत असून त्यासाठी रस्ते अडवून तेथे व्यासपीठ उभारले जात आहेत. तसेच रस्त्यावर खुच्र्या मांडून कार्यकर्त्यांसाठी आसनाची व्यवस्था करण्यात येते. या सभेसाठी एकेरी मार्ग अडविण्यात येत असला तरी दुसऱ्या बाजूच्या रस्त्यावरही कार्यकर्ते गर्दी करीत असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. परिणामी, या भागातील वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या लांबलचक रांगा लागत आहेत. दिवसभराचे काम आटपून घरी परतणाऱ्या नोकरदारांना त्याचा खूप त्रास होत आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Election meeting on road create traffic deadlock
First published on: 19-04-2014 at 02:38 IST