शासकीय सुटय़ांची संख्या वाढल्याने नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी  उमेदवारांना अर्ज दाखल करण्यास कमी अवधी मिळणार आहे. यावर उपाय म्हणून पालिका प्रशासनाने दोन सुटय़ांच्या दिवशी निवडणुकीचे कामकाज सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, तर जात पडताळणी प्रमाणपत्र उमेदवाराला अर्जासोबत जोडावे लागणार आहे. चार मतदान केंद्रांवर मतमोजणी केली जाणार आहे.
नवी मुंबई महापालिकेची निवडणूक २२ एप्रिल रोजी होत आहे. ३१ मार्च ते ६ एप्रिलपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत आहे. या दरम्यान तीन सुटय़ा येत आहेत. मात्र रविवार, ५ एप्रिल रोजी येणाऱ्या सुट्टीच्या दिवशी निवडणूकविषयक कामकाज केले जाणार नाही. परंतु २ व ३ एप्रिल रोजी सुट्टीच्या दिवशी मात्र कामकाज केले जाणार आहे,  अशी माहिती पालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे. ८ एप्रिल रोजी उमेदवारी अर्जाची छानणी केली जाणार आहे. १० एप्रिलपासून उमेदवारांना माघार घेता येणार आहे.
यांनतर उमेदवार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. ११ एप्रिल रोजी मतदान केंद्रनिहाय यादी घोषित केली जाणार आहे. आचारसंहिता पथकप्रमुखपदी उपायुक्त सुभाष गायकर आणि मधुकर कुचेकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. १११ प्रभागांसाठी ७६८ मतदान केंद्रे आहेत. ७३८ मतदान आधिकारी कार्यरत राहणार असून उपायुक्त अमरीश पटनिगिरे यांच्याकडे निवडणूक आधिकारी म्हणून कार्यरत राहणार आहेत. एकूण १०९८ ईव्हीएम मतदान यंत्रे मतदानासाठी उपलब्ध करण्यात आली आहेत. १० निवडणूक आधिकरी या मतदानासाठी कार्यरत राहणार आहेत.
उमेदवाराला खर्चासाठी ४ लाख रुपये मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. वाशी, तुर्भे आणि घणसोली येथे चार ठिकाणी मतमोजणी केली जाणार आहे. २००५च्या निवडणुकीमध्ये मतदान प्रकिया पूर्ण झाल्यावर मतदान यंत्रे मतमोजणी केंद्रावर तैनात केल्यानंतर अचानक वीजपुरवठा खंडित झाला होता. यावेळी असा प्रकार घडू नये म्हणून जनरेटरची व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे. सोशल मीडियावर प्रचाराची वेळ उलटून गेल्यावरदेखील प्रचार सुरूच असतो.
यासंदर्भात निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन घेतले जाणार असल्याची माहितीदेखील वाघमारे यांनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Election work on government off days
First published on: 31-03-2015 at 06:34 IST