कर्मचारी निवृत्ती वेतन योजना -१९९५ (इ.पी.एस.)मध्ये सुधारणा करण्यासाठी संसदेच्या आगामी अधिवेशनात कोशियारी समितीच्या शिफारसींबाबत चर्चा व्हावी, या मागणीसाठी कर्मचारी निवृत्ती वेतन योजना -१९९५ राष्ट्रीय समन्वय समितीच्यावतीने शहरातील संविधान चौकात धरणे देण्यात आली.
या आंदोलनात राष्ट्रीय समन्वय समितीचे अध्यक्ष प्रकाश येंडे, महासचिव प्रकाश पाठक, प्रभाकर खोडे, ए. बी. कुसरे, सी.डी. सिंग, देव पुरण व समिती पदाधिकाऱ्यांसह देशातील १५ राज्यांतून आलेले जवळपास सहाशे निवृतीवेतनधारक सहभागी झाले. योगानंद काळे यांनी सभेत विचार मांडले. राष्ट्रीय समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने क्षेत्रीय भविष्य निधीचे डॉ. एच.एम. तिरपुडे व विभागीय आयुक्तांना मागण्यांचे निवेदन सादर करून त्यांच्यासोबत चर्चा केली. पुढील कार्यवाहीसाठी हे निवेदन त्वरित पाठविण्यात येईल, असे आश्वासन डॉ. तिरपुडे यांनी शिष्टमंडळाला दिले. कर्मचारी निवृत्ती वेतन योजना देशातील ४४.८५ लाख कर्मचाऱ्यांना लागू आहे. ही संख्या भविष्यात सात कोटीपर्यंत वाढेल. या योजनेत गेल्या १५ वर्षांत कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. कर्मचारी भविष्यनिधीमध्ये कोटय़वधी रुपये जमा आहेत. सर्व निवृत्तीधारकांना सात हजार रुपये दरमहा निवृत्ती वेतन दिले जाऊ शकते, पण केवळ साधारण दराने व्याज दिले जात आहे. याकडेही समितीने निवेदनातून लक्ष वेधले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Employee pension scheme national coordination committee protest
First published on: 10-10-2014 at 03:01 IST