नगर शहरात गुरुवारी तब्बल पावणेतीन इंच पावसाची नोंद झाली. राहाता तालुक्यातही तेवढाच पाऊस झाला. परतीच्या पावसाच्या पुनरागमनाने जिल्हय़ात आशादायक वातावरण तयार झाले आहे. जिल्हय़ात आत्तापर्यंत सरासरीच्या १०७ टक्के पाऊस झाला आहे.
काही तालुक्यांचा अपवाद वगळता गुरुवारी जिल्हय़ाच्या मोठय़ा भागात पाऊस झाला. नगर शहर व परिसरात दुपारी आणि रात्रीही मुसळधार पाऊस झाला. रात्रीचा पाऊस उशिरापर्यंत सुरू होता. आज सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत तब्बल ६७ मिलिमीटर (पावणेतीन इंच) पावसाची नोंद झाली. या पावसाळय़ातील शहरातील हा विक्रमी पाऊस आहे. शुक्रवारीही दिवसभर शहरात कमालीची उष्णता होती. सायंकाळी आकाशात ढगांची चांगली गर्दीही झाली. त्या वेळी मोठय़ा पावसाचीच चिन्हे होती.
संगमनेर, अकोले, कोपरगाव, कर्जत वगळता जिल्हय़ात अन्यत्र गुरुवारी कमीअधिक पाऊस झाला. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
सर्व आकडे मिलिमीटरमध्ये आहेत. श्रीरामपूर- ७, राहुरी- ५, नेवासे- २८, राहाता- ६९.६, नगर- ६७, शेवगाव- ४४, पाथर्डी- २०, पारनेर- ५ आणि जामखेड- २.