पाण्याखाली येणाऱ्या क्षेत्राच्या सहभागावर आधारित विकास घडविण्याच्या अनोख्या प्रकल्पाची सिन्नर तालुक्यातील तीन गावांमध्ये मुहूर्तमेढ रोवण्यात आली आहे. नैसर्गिक संसाधनांचे पुनर्निर्माण घडवून आणण्याच्या उद्देशाने राबविल्या जाणाऱ्या या प्रकल्पातून शेतकी उत्पादन आणि शेतकऱ्यांच्या उपजीविकेमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न आहे. दोन वर्षे चालणाऱ्या या प्रकल्पातून २९७ हून अधिक कुटुंबांना लाभ होणार असून, त्यांच्या उपजीविकेत सुधारणा होणार आहे.
हिंदुस्थान कोको-कोला बेव्हरेजेस कंपनीने वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट आणि संजीवनी इस्टिटय़ूट फॉर एम्पॉवरमेण्ट अ‍ॅण्ड डेव्हलपमेण्ट यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या सोबतीने या प्रकल्पाची सुरुवात केली आहे. यानिमित्त सिन्नरच्या चंद्रपूर गावात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ग्रामस्थ, पंचायत समिती सदस्य, कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. या प्रकल्पातून जल संसाधनात सुधारणा करून सिंचन क्षमता बळकट करणे, नव्या सिंचन क्षमता निर्माण करणे आणि त्यातून खरीप हंगामात महत्त्वपूर्ण असलेली सिंचन सुविधा मिळवून देणे आणि पर्यायाने पीक उत्पादन वाढविण्यास हातभार लावला जाणार आहे. सिन्नर तालुक्यातील खरपळे, चंद्रपूर व जामगाव या तीन गावांमध्ये हा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सामाजिक व आर्थिक सुधारणेसाठी पाण्याची भूमिका महत्त्वाची ठरते. सिन्नर हा तसा दुष्काळग्रस्त तालुका. या प्रकल्पासाठी निवडलेली गावे दुर्गम आहेत. त्या परिसरात ६०० मिलीमीटर पाऊस पडतो. ही गावे डोंगराळ भागात वसलेली असल्याने आणि जमिनीत अनेक चढ-उतार असल्याने मृदेची प्रचंड धूप होते आणि त्यामुळे पिण्याचे पाणी व शेतीकरिता पाणी मिळणे दुरापास्त होते. शेती हा स्थानिकांचा प्रमुख व्यवसाय असून ते उत्पन्न व उपजीविकेचे साधन आहे. पाण्याच्या स्रोतांचे व्यवस्थापन कसे करावे याबद्दल माहिती नसल्याने टंचाईचा प्रश्न बिकट बनला आहे. या पाश्र्वभूमीवर, कृषी उत्पादनात चिरस्थायी सुधारणा आणि नैसर्गिक संसाधनांच्या वापरातून पाणीटंचाई, मातीची धूप, जमिनीचा दर्जा खालावणे आणि कुटुंब विस्थापित होण्याच्या समस्यांवर उपाययोजनेचा प्रयत्न या प्रकल्पातून करण्यात येणार आहे.
पावसाच्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे संधारण करण्यासाठी मृदा आणि जलसंधारण कार्य आयोजित करण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. पर्यावरणाशी मैत्री राखणाऱ्या पद्धतींनी अभिनव तंत्राचा अवलंब करणे, हवामानामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी पीकविषयक सल्ला असे नवीन मार्ग सुचविले जातील. पिण्यासह शेतीसाठी पाण्याची अधिक उपलब्धता, कृषी उत्पादनात वाढ करून कुटुंबीयांची आर्थिक स्थिती बळकट होईल, असा विश्वास संयोजकांनी व्यक्त केला. या प्रकल्पांतर्गत ५४६ हेक्टर जमिनीवरील मृदा व जलसंधारणासाठी उपाय योजण्यात येणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Everything for water management of sinnar
First published on: 03-04-2015 at 01:52 IST