राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू अनुपकुमार यांनी विधिशाखेचा निकाल येत्या २६ जूनपर्यंत जाहीर करण्याचे आश्वासन दिले आहे. याशिवाय बंदी घातलेल्या ‘त्या’ २५० महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे विशेष परीक्षा यावेळी घेणार किंवा नाही यासाठी त्यांनी येत्या २६ जूनला होऊ घातलेल्या विद्वत परिषदेच्या बैठकीत निर्णय होईल, असेही सांगितले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सोमवारी विद्वत परिषद सुरू असताना केलेल्या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर कुलगुरूंनी हे आश्वासन दिले. अनुपकुमार यांनी दिलेले आश्वासन पाळण्यात २६ जून रोजी होऊ घातलेल्या बार कौन्सिलच्या परीक्षेला विधिशाखेचे विद्यार्थी बसू शकतील. सोमवारी अभाविपने प्रवेशबंदी लादलेल्या सर्व महाविद्यालयांनी नियमित प्राध्यापकांची नियुक्ती आणि अन्य नियमांची अंमलबजावणी करेपर्यंत त्या २५० महाविद्यालयांवरील बंदी कायम ठेवण्याची मागणी केली. प्रवेशबंदी लादलेल्या त्या महाविद्यालयांतील ६,१६१ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शिक्षणाची पर्यायी व्यवस्था करावी, ४५ दिवसांमध्ये निकाल जाहीर करावा, मूल्यांकन व फेरमूल्यांनातील त्रुटी दूर व्हाव्यात या मागण्यांचे निवेदन सादर केले. एलएलबीचा निकाल २६ दिवसांत लावणे, मूल्यांकन व फेरमूल्यांकनाचे निकाल ४५ दिवसांच्या आत लावण्याचे आश्वासन अनुपकुमार यांनी दिले. तसेच प्रवेशबंदी लादलेल्या २५० महाविद्यालयांबाबत विद्यापीठाचा कठोर दृष्टीकोण कायम असल्याचे सांगत जोपर्यंत महाविद्यालये नियमित शिक्षकांची नियुक्ती आणि अन्य नियमांची अंमलबजावणी करीत नाहीत तोवर बंदी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय बंदी घातलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे विशेष परीक्षा यावेळी घेणार किंवा नाही यासाठी त्यांनी येत्या २६ जूनला होऊ घातलेल्या विद्वत परिषदेच्या बैठकीत निर्णय होईल, असेही सांगितले. अभाविपचे नीरज जौधरकर, गौरव हरडे, अमेर विश्वरूप, रोशन नवलाखे, राजसिंह बघेल, इमरान पठाण आणि सुनीता मौंदेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.