स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेले ऊसदर आंदोलन वाई परिसरात सुरूच राहिले. वाई, सातारा रस्त्यावर शेतकरी संघटनेने किसन वीर सातारा साखर कारखान्याकडे जाणारी वाहने अडवली. ट्रॅक्टरच्या टायरमधील हवा सोडली.
शेतकरी संघटनेने ऊसदराच्या विषयावर सुरू केलेले आंदोलन मंगळवारी लिंब फाटय़ावर झाले होते. पुणे-सातारा रस्त्यावर झालेल्या आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत झाली. दगडफेकीत पोलीस कर्मचारी जखमी झाला होता. दरम्यान अनेक मार्गावर सुरू असणाऱ्या एस.टी.बसची संख्या कमी केली आहे.
पंधराहून अधिक गाडय़ांची तोडफोड झाल्याने एस.टी.च्या सातारा विभाग नियंत्रकांनी हा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल होत आहेत. आडवळणावरच्या गावात आज भाऊबीजेला जाताना अनेकांना त्रासाला सामोरे जावे लागले. वाई-सातारा रस्त्यावर बावधन नाका व कडेगाव पुलावर शेतकरी संघटनेच्या आंदोलकांनी ट्रॅक्टर ट्रॉलीतील हवा सोडली. अचानक झालेल्या आंदोलनामुळे पोलिसांची तारांबळ उडाली.
‘किसन वीर’चे गाळप बंद
दसऱ्याला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोळी टाकून सुरू झालेला किसनवीर कारखाना बुधवारी दुपारपासून बंद झाला. उसाअभावी गाळप बंद करावे लागले. शेतकरी संघटनेने आंदोलन पुकारल्यानंतर ऊस तोडणी व वाहतुकीवर परिणाम झाला.
त्यामुळे सुरुवातीला २ हजार ५०० ने सुरू असणारे गाळप बंद करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला.