लक्ष्मी चावडी ते एमजीएम रस्ता करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे. खासदार, आमदार स्वत:च्याच मतदारसंघात कामे ओढण्यात मग्न आहेत. राजकीय दबावामुळे काम होत नसल्याने महापालिका आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या दालनात प्रश्न सुटेपर्यंत मुक्काम ठोकून आंदोलन करण्याचा इशारा माजी उपमहापौर प्रशांत देसरडा यांनी दिला.
शहरातील जालना रस्त्याला पर्यायी म्हणून लक्ष्मी चावडी ते एमजीएम रस्ता आहे. रस्ता रुंदीकरणासाठी वर्षांपूर्वी सर्वात आधी तोडफोड सुरू करण्यात आली. दीडशे ते दोनशे नागरिक रस्त्यावर आले आहेत. अनेकांनी घरे रिकामे करून दिली. भूसंपादनाचा एकही रुपया मिळाला नाही, तरी रस्त्याचे काम होत नाही.
 किरडपुरा भागातील रस्ताही रखडला आहे. रस्त्याच्या कामाकडे आमदारांचे लक्ष नाही. निविदा न करताच अन्य ठिकाणी कामे हाती घेतली जात आहेत. याच्या निषेधार्थ आयुक्त दालनात प्रश्न सुटेपर्यंत मुक्काम ठोकू, असे देसरडा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.