खासदार राजू शेट्टी यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला खुनाचा गुन्हा मागे घ्यावा, या मागणीसाठी शनिवारी महायुतीच्या वतीने करवीर तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. तसेच या वेळी तहसीलदार शरद पाटील यांना दिलेल्या निवेदनात मागणीचे दखल न घेतल्यास महायुतीच्यावतीने राज्यभर रस्त्यांवर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.    
१२ नोंव्हेबर २०१२ रोजी ऊस दर आंदोलन चांगलेच भडकले होते. शिरोली फाटा येथे झालेल्या आंदोलनावेळी आंदोलकांनी चार पोलिसांना बेदम मारहाण केली होती. त्यामध्ये सहायक फौजदार मोहन पवार हे गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर दोन वर्षे कोम्यात असलेले पवार यांचा गेल्या आठवडय़ात मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी शिरोली पोलिसांनी खासदार राजू शेट्टी यांच्यासह ८४ जणांवर खुनाचा प्रयत्न(३०७) अन्वये गुन्हा दाखल केला होता. तर पवार यांच्या मृत्यूनंतर गुन्ह्य़च्या तीव्रतेत वाढ करण्यात आली असून खासदार शेट्टी यांच्यासह सर्व आरोपींवर ३०२ कलम लावण्यात आले आहे. सर्व आरोपींना योग्यवेळी अटक करणार असल्याचे विधान पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव यांनी केले होते.    
पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेवर महायुतीने आक्षेप घेतला आहे. आंदोलनाच्या दिवशी खासदार शेट्टी यांना इंदापूर येथे अटक करण्यात आली होती. त्यामुळे त्यांचा पोलीस मारहाणीच्या घटनेशी संबंध नसल्याचे महायुतीचे म्हणणे आहे. राजकीय सूडबुद्धीने शेट्टी यांना या प्रकरणात गोवून लोकसभा निवडणुकीत त्यांची प्रतिमा काळवंडली जावी, असे डावपेच आखले जात असल्याचा आक्षेप महायुतीने घेतला आहे. त्यासाठीच शनिवारी महायुतीच्या वतीने करवीर तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यामध्ये आमदार चंद्रकांत पाटील, आमदार चंद्रदीप नरके, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, जिल्हाप्रमुख विजय देवणे, भाजपाचे शहराध्यक्ष महेश जाधव, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, किशोर घाटगे, जनार्दन पाटील यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fast of mahayuti against crime on raju shetty
First published on: 16-02-2014 at 01:40 IST