सिंघम’ या हिंदी चित्रपटाने प्रचंड लोकप्रियता मिळवली. पोलीस विरुद्ध गुंड यांची हाणामारी, पोलीस हीरो बऱ्याच कालावधीनंतर हिंदी चित्रपटातून अवतरला आणि मूळ दाक्षिणात्य चित्रपटाची नक्कल असलेल्या ‘सिंघम’मध्ये अजय देवगण आणि खलनायकाच्या भूमिकेतील प्रकाश राज यांची जुगलबंदी प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. आता मराठीमध्ये ‘सिंघमचा बाप’ नावाचा चित्रपट येणार आहे. अमोल मुके दिग्दर्शन करणार असून भूमी अहिरे निर्मिती करणार आहेत. या चित्रपटाचा मुहूर्त महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते नुकताच संगमनेर येथे करण्यात आला. कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याच्या भोवती चित्रपटाचे कथानक गुंफण्यात आले असून प्रमुख भूमिका अभिजित राहणे साकारणार आहे. त्याशिवाय भूमी अहिरे, किशोर नांदलस्कर, वीरेन पाटील, संजय दाभोळकर, दत्ता सोनावणे, राज बागूलकर, विशाल कुलथे आदी कलावंत यात आहेत. ‘सिंघमचा बाप’ चित्रपटाची कथा परशुराम घुले यांनी लिहिली असून संवादलेखन मुरलीधर भावसार यांनी केले आहे.