बालवयात आपल्याला टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्याचा छंद असतो. पुढे काळाच्या ओघात तो इतिहासजमा होतो. मात्र काहीजण त्याला वेगळं परिमाण प्राप्त करून देतात. मालाड येथील प्रताप केणी हे असंच एक वेगळं रसायन. लहानपणापासून तांत्रिक शिक्षणाची आवड होती. परंतु परिस्थितीमुळे पध्दतशीर तंत्रशिक्षण घेता आले नाही. पण ती कसर त्यांनी स्वप्रयत्नांतून भरून काढली. प्रत्यक्ष यंत्रावर काम करण्याची संधी मिळाली नाही. परंतु विविध पदार्थाच्या मदतीने त्यांनी ती यंत्रेच उभी केली. सर्वप्रथम त्यांनी कॅसेटच्या कव्हरला आकार देऊन रेल्वे इंजिन तयार केले. त्याला खेळण्यातल्या मोटारीचे चावीचे मशीन जोडले. हे पळणारे इंजिन त्यांनी गणेशोत्सवामध्ये मांडले. या प्रयोगाचे बरेच कौतुक झाल्याने त्यांची इच्छाशक्ती अधिक प्रबळ झाली.
आज ४० वर्षांनंतर कुठल्याही तांत्रिक शिक्षणाशिवाय देशातील कोणत्याही रेल्वेचे मिनी मॉडेल करण्यात त्यांचा हातखंडा आहे. मुंबईची लोकल, कोकण रेल्वे, खेड्यापाड्यात जाऊन गोरगरीबांसाठी मोफत आरोग्य सेवा पुरवणारी जीवनरेखा ट्रेन, दिल्ली आणि मुंबईची मेट्रो यांच्या हुबेहूब प्रतिकृती केणींनी तयार केल्या आहेत.
घराशेजारी दहा बाय तीन फुटांच्या अगदी छोट्याश्या वर्कशॉपमध्ये केणी प्लास्टिक, काड्या आणि असंख्य टाकाऊ वस्तूंपासून स्वयंचलित रेल्वे इंजिन तयार करतात. केणी मूळ कोळी समाजातील. घरचा व्यवसाय मासेमारी असल्याने शिक्षणाचा अभाव. तरीही त्यांनी सातवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. १९८२ साली त्यांना मध्य रेल्वेत खलाशी म्हणून नोकरी मिळाली. तेथून ते क्रेन ड्रायव्हपर्यंत चढत गेले. माटुंगा कार्यशाळेचे मुख्य प्रबंधक चक्रवर्ती यांनी त्यांना खूप प्रोत्साहन दिले. त्यांनी ट्रेनची मॉडेल्स तपासून पाहण्यासाठी वर्कशॉपमध्ये जागा करून दिली. तसेच युनियननेही भरपूर सहकार्य केल्याचे केणी आवर्जून सांगतात. काही वर्षांपूर्वी केणींनी कोळशाचे इंजिनही तयार केले होते. त्या इंजिनात त्यांनी सिगारेट पेटवून धूर काढला होता. चावी फिरवताच लायटर सुरू होऊन चावीचे इंजिन धूर सोडत पळत राही. त्यांची ही कला पाहून रेल्वे प्रशासनातर्फे १००० रु रोख व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. त्यावेळी त्यांचा पगार अवघा ४०० रूपये होता. रेल्वेची सिग्नल यंत्रणा, रुळांचे सांधे कसे बदलतात, एकाच वेळी चारही मार्गावरून गाड्या कशा धावतात, गाडी स्टेशनात येण्यापूर्वी व आल्यावर होणारी घोषणा, मोटरमन वाजवतो ती घंटा, उघडणारे फाटक, पुलावर चढणारी ट्रेन, व हॉर्न या सा-यांचा समावेश केणींच्या धावत्या मॉडेलमध्ये असतो. २६ जुलच्या पावसात मंदगतीने धावणा-या ट्रेन, लोकलमधील बॉम्बस्फोट अशी प्रासंगिक चलचित्रेही त्यांनी तयार केली आहेत. काही वर्षांपूर्वी इंडो-जर्मन ट्रेनचे मॉडेल बनवण्यासाठी देशभरातून चारजणांची निवड झाली त्यामध्ये प्रताप केणींचा समावेश होता.
रेल्वेतील अधिका-यांचा आता केणींवर इतका दृढ विश्वास आहे की, एखादं नवीन लोकलचं इंजिन मुंबईत येण्याआधी फोटोवरून मॉडेल तयार केरण्याचंही काम त्यांच्याचकडे देण्यात येतं. आणि केणींनी आजवर ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली आहे. एवढंच नव्हे तर रेल्वेतील मोठे अधिकारी निवृत्त होणार असतील तर त्यांना भेट देण्यासाठी ट्रेनचे मॉडेलही प्रताप केणीच तयार करतात.
इतकी चांगली कला अवगत असूनही केणींनी आजवर व्यवसायिक रूप दिलेले नाही. स्वत:ला आनंद मिळेल आणि त्यातून लोकांना काहीतरी नवीन पहायला मिळेल हा त्यांचा प्रयत्न असतो. त्यांनी तयार केलेली मॉडेल वरिष्ठ विद्युत अभियंता कार्यालय, सीएसटी यांच्या कार्यालयाजवळील कलादालनात पाहण्यासाठी ठेवण्यात आले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 10th Nov 2012 रोजी प्रकाशित
झुकझुक झुकझुक गाडी ही पळे!
बालवयात आपल्याला टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्याचा छंद असतो. पुढे काळाच्या ओघात तो इतिहासजमा होतो. मात्र काहीजण त्याला वेगळं परिमाण प्राप्त करून देतात. मालाड येथील प्रताप केणी हे असंच एक वेगळं रसायन.

First published on: 10-11-2012 at 11:42 IST
मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Feature on train