कोल्हापूर जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांना खतांचे अनुदान थेट त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. या संदर्भात खत व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडील माहिती आज जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे सादर केली. जानेवारीपासून शेतकऱ्यांना खतांचे अनुदान मिळण्यास सुरुवात होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
शासनाने शेतकऱ्यांना खतांचे अनुदान थेट त्यांच्या खात्यावर देण्याची योजना हाती घेतली आहे. खत अनुदानातील होणारा घोटाळा लक्षात घेऊन त्यातील दोष दूर करण्याच्या उद्दिष्टाने ही प्रक्रिया राबविली जाणार आहे. खत व्यापाऱ्यांकडून कोणत्या प्रकारचे खत किती प्रमाणात विकले जाते, या संदर्भातील माहिती देण्याचे काम कृषी विभागाकडून सुरू होते.     
शुक्रवारी या संदर्भातील माहिती भरून घेण्याचे काम पूर्ण झाले. जिल्ह्य़ातील सर्व खत विक्रेत्यांनी त्यांच्याकडील खतविषयक व्यापाराची सविस्तर माहिती सादर केली. व्यापाऱ्यांकडील माहिती नोंदणी संकलनाचे काम पूर्ण झाले असून जानेवारीपासून ज्या शेतकऱ्यांच्या नावे सात-बारा आहे, त्या नावाने थेट अनुदान मिळण्यास सुरुवात होईल, असे कृषी अधिकारी सुरेश मगदूम यांनी सांगितले.