ठाणे शहरातील गरीब वस्त्यांमधील गुणी कलाकारांना व्यासपीठ मिळावे, याहेतूने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ रंगकर्मी व साहित्यिक रत्नाकर मतकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेला पहिला नाटय़ जल्लोष महोत्सव जानेवारी महिन्यात आयोजित केला जाणार आहे. पूर्वतयारीसाठी समता विचार प्रसारक संस्थेचे अध्यक्ष जगदीश खैरालीया यांच्या अध्यक्षतेखाली आणि रत्नाकर मतकरी यांच्या उपस्थितीत दोन बैठका पार पडल्या.
ठाणे शहरातील खारटन रोड, नागसेननगर, राबोडी, माजिवडा, मानपाडा, ढोकाळी, मनोरमानगर, सावरकरनगर, येऊर, लोकमान्यनगर, वागळे इस्टेट, यशोधननगर आदी भागांतून नाटय़ जल्लोषमध्ये सहभागी होणाऱ्या युवकांची गटबांधणी करण्यात आली आहे.  २० नोव्हेंबपर्यंत सर्व गटांची बांधणी पूर्ण करण्यात येणार आहे अशी माहिती संस्थेच्या कार्यवाहक व गटबांधणी समिती संयोजक लतिका सु.मो यांनी दिली.   नाटय़ रुपाचे लेखन, भाषा, नेपथ्य, संगीत आदीबाबत कोणतेही नियम तसेच बंधने नसतील, असेही रत्नाकर मतकरी यांनी स्पष्ट केले.  ज्येष्ठ रंगकर्मी सुहास जोशी, उदय सबनीस, सुप्रिया विनोद, विजू माने, अरुंधती भालेराव आदींचा मदत करण्यामध्ये सहभाग असणार आहे.  महोत्सवाच्या आयोजनासाठी जिजासा ट्रस्टचे सुरेंद्र दिघे, वी नीड यु सोसायटीचे जयंत कुलकर्णी, जागचे मिलिंद गायकवाड, रंगकर्मी मकरंद तोरसकर आदींची ‘नाटय़ जल्लोष व्यवस्थापन समिती’ गठित करण्यात आली आहे, अशी माहिती मतकरी यांनी दिली.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Festival drama camp in thane during january
First published on: 31-10-2014 at 12:50 IST