शहरातील ग्रामीण भागास पुरविण्यात आलेल्या पाण्यास बीएचसी पावडरचा वास येत असल्याचे प्रकरण सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षानेही गांभीर्याने घेतले आहे. नगराध्यक्षांचे पती विनोद राक्षे यांनी स्वत: अधिकाऱ्यांसह पाहणी केली तर जनविकास आघाडीचे गटनेते डॉ. अजेय गर्जे व इतर नगरसेवकांनी पाणीपुरवठा विभागास धारेवर धरले व या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी केली.
याबाबत विनोद राक्षे म्हणाले की, नगर-मनमाड रस्त्यावर नगरपालिकेचा २ नंबरचा साठवण तलाव असून सदर या तलावालाच अतिशय उग्र वास येत असल्याने हा नेमका वास कसला त्याबाबत चौकशी करावी लागेल. साठवण तलावातील ५ ठिकाणच्या पाण्याचे नमुने राहता येथील प्रयोगशाळेत पाठविले असून, याचा अहवाल उद्या दुपापर्यंत येईल.
दरम्यान, आमदार अशोक काळे यांच्याकडे दूरध्वनीवरून तक्रारी केल्या होत्या. काळे यांनी सदरचा विषय गांभीर्याने घेऊन विरोधी जनविकास आघाडीचे डॉ. अजेय गर्जे व नगरसेवकांना दूषित पाण्याविषयी माहिती घेण्याचे आदेश दिले. पाणीपुरवठा विभागात जाऊन त्यांना याबाबत जाब विचारावा असे सुचविले. त्यानुसार जनविकास आघाडीचे डॉ. गर्जे, नगरसेवक कृष्णा आढाव, संजय जगताप, अतुल काळे, जितेंद्र रणशूर आदींनी शंकर जलाशावर जाऊन पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी नरळे व विश्वास धुमाळ यांना धारेवर धरले. नरळे यांनी जनविकास आघाडीचे निवेदन स्वीकारले. डॉ. गर्जे याबाबत म्हणाले की, सत्ताधाऱ्यांना याप्रकरणी घातपाताचा संशय असेल तर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी, ही बाब अतिशय गंभीर असून, सत्ताधाऱ्यांनी नागरिकांच्या आरोग्याशी खेळू नये, याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी डॉ. गर्जे यांनी केली.
 नगरपालिकेला ३ महिन्यांपासून मुख्याधिकारी नाही. प्रभारी मुख्याधिकारी हजर नाही. नगराध्यक्षा सुरेखा राक्षे यांच्या दालनात गेल्या ७ दिवसांपासून नाहीत. प्रशासनासह नगराध्यक्षांच्या गैरहजेरीमुळे नगरपालिका वाऱ्यावर असून, पालिकेचा कारभार नेमके कोण चालवतो? हाच खरा प्रश्न आहे.