निसर्गाची अवकृपा, त्यात सरकारकडून योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी राजा चांगलाच आर्थिक संकटात सापडला आहे. कापसाच्या भावासाठी लढाई यापुढे चालूच राहील, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य ब. ल. तामसकर यांनी केले.
कापसाला भाव मिळावा, या मागणीसाठी डिसेंबर १९८६मध्ये शेतकरी संघटनेतर्फे औंढा नागनाथ तालुक्यात सुरेगाव रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात डिग्रस कऱ्हाळे येथील सरपंच निवृत्ती कऱ्हाळे, परसराम कऱ्हाळे व सुखाडीचे ग्यानदेव टोम्पे या तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. कापसाला भाव मागण्यासाठी हुतात्मा झालेल्या शेतकऱ्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी डिग्रस कऱ्हाळे येथे सोमवारी कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी तामसकर बोलत होते. स्वतंत्र भारत पक्षाचे राज्य सचिव गुणवंत पाटील हंगरगेकर, संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवीप्रसाद ढोबळे, खंडबाराव पोले, खंडबाराव नाईक, उत्तमराव वाबळे, बळीराम कऱ्हाळे, सरपंच गंगाधर साखरे, प्रल्हादराव राखोंडे, सचिन मालेकर आदी उपस्थित होते. हुतात्मा ३ शेतकऱ्यांना या वेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.
तामसकर यांनी सांगितले, की निसर्गाच्या अवकृपेने कापसावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने कापसाच्या पिकाला उतारा कमी आहे. कापूस लागवडीवर होणारा खर्च व त्यातून कमी दर्जाच्या उत्पादनामुळे शेतकऱ्यांचे अवसान गळाले आहे. तो आर्थिक अडचणीत सापडला आहे.