मुलांच्या भांडणावरून दोन कुटुंबीयांत जुंपली

मुलांमध्ये पैसे देण्या-घेण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यवसान दोन कुटुंबीयांमध्ये जोरदार हाणामारीत झाले. दोन्ही बाजूंकडील दोनजण यात जखमी झाले. त्यांना घाटी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.

मुलांमध्ये पैसे देण्या-घेण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यवसान दोन कुटुंबीयांमध्ये जोरदार हाणामारीत झाले. दोन्ही बाजूंकडील दोनजण यात जखमी झाले. त्यांना घाटी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. या प्रकरणी एम सिडको पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद देण्यात आली. दोन्ही बाजूंच्या सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
पहिली फिर्याद अण्णा बालाजी ढगे यांनी दिली. त्यात म्हटले आहे, की रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास शाहनगर येथे फिर्यादीच्या घरासमोर आरोपी नितीन हिवराळे, राहुल हिवराळे व रघुनाथ हिवराळे (शाहनगर) यांनी फिर्यादी ढगे व त्यांचा मुलगा या दोघांना पैसे देण्या-घेण्याच्या कारणावरून लाकडी दांडय़ाने मारहाण केली. यात ढगे यांचे डोके फुटले.
रघुनाथ बळवंत हिवराळे (वय ४२, अशोकनगर, एमआयडीसी, चिकलठाणा) यांनी दुसरी फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे, की रविवारी रात्री आठच्या सुमारास अशोकनगर (मस्नतपूर, चिकलठाणा) येथे आरोपी सुनील ढगे, सनी गायकवाड व भगवान गायकवाड यांनी फिर्यादी हिवराळे व त्याच्या मुलास जुन्या भांडणाच्या कारणावरून लोखंडी सळई व लाकडी दांडय़ाने मारहाण केली. फिर्यादीच्या मुलास डाव्या हातावर मारून फ्रॅक्चर करून गंभीर दुखापत केली. दोन्ही फिर्यादी नोंदवून घेत पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
किराणा दुकान फोडले
दुकानाचे शटर तोडून दुकानातून रोख रक्कम व किराणा साहित्य असा ४७ हजार २०० रुपये किमतीचा ऐवज चोरटय़ांनी लांबविला. रामनगर येथील देवगिरी प्रोव्हिजन (विठ्ठल चौक) या दुकानात ही चोरी झाली. दिगंबर दत्तात्रय कदम (वय ५७, रामनगर, मुकुंदवाडी) यांनी फिर्याद दिली. रविवारी रात्री साडेदहा ते सोमवारी सकाळी सहादरम्यान ही चोरी झाली. सोमवारी सकाळी दुकान उघडण्यास गेले असता चोरी झाल्याचे कदम यांनी तक्रारीत म्हटले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Fighting with two families two injured