शहरातील महाकवी कालिदास कला मंदिरासमोरील रस्त्यावर अचानक कोसळलेल्या वटवृक्षाच्या दुर्घटनेला महापालिका जबाबदार असल्याची तक्रार पर्यावरणप्रेमींनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे. हा वटवृक्ष धोकेदायक होता तर पालिकेने आधीच तोडायला हवा होता अथवा त्या ठिकाणी ‘धोकेदायक झाड’ असा फलक लावणे आवश्यक होते. या अनुषंगाने कोणतीही दक्षता न घेणाऱ्या पालिकेच्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
शहरातील झाडांचे संगोपन करणे, त्यांची दरवर्षी गणना करणे आणि त्यांच्या परीक्षणाचा अहवाल ठेवणे, हे महापालिकेच्या कामाचा भाग आहे. पालिका हद्दीतील असंख्य झाडे वेगवेगळ्या कारणामुळे धोकेदायक बनली असल्याचे निशिकांत पगारे, राजेश पंडित, नितीन रुईकर यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. सोमवारी जिल्हा परिषदेकडून शालिमारकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वटवृक्ष कोसळून त्यात महापालिकेच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या झाडाला वाळवी लागल्यामुळे तो कोसळल्याचा अंदाज वर्तविला आहे. या पाश्र्वभूमीवर, पर्यावरणप्रेमींनी या प्रकाराबद्दल साशंकता व्यक्त केली. शहरात पेव्हर ब्लॉक अथवा डांबरीकरणाचे काम करताना रस्त्यावरील झाडांना पूर्णपणे बंदीस्त केले जाते. झाडांच्या मुळाशी केरकचरा टाकला जातो. झाडे तोडण्याची परवानगी लवकर मिळत नसल्याने त्यावर अॅसीड टाकणे, झाडांची साल काढणे, जेणेकरून ते झाड मृतप्राय होईल, अशी स्थिती निर्माण केली जाते. महाकवी कालिदास कला मंदिरासमोरील वटवृक्षाबाबतही असाच प्रकार घडला असल्याची शक्यता संबंधितांनी निवेदनात व्यक्त केली आहे. या वटवृक्षाला वाळवी लागल्यामुळे पालिकेने हे झाड धोकेदायक आहे, हे आधीच जाहीर करायला हवे होते. एवढेच नव्हे तर, हा वटवृक्ष खबरदारीचा उपाय म्हणून तोडायला हवा होता. किमान त्या झाडावर मोठा फलक लावणे अभिप्रेत होते. परंतु, पालिकेने असे काही केले नाही. यामुळे कोसळलेल्या वटवृक्षाची तज्ज्ञ व्यक्तींकडून छाननी करावी आणि धोक्याचे फलक न लावल्याबद्दल पालिका अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.