चित्रपटनिर्मितीत रस आहे म्हणून.. चित्रपट आवडतात म्हणून.. किंवा आहे पैसा तो चित्रपटात गुंतवायचा म्हणून.. चित्रपट बनवण्याची अशी अनेक कारणे एखाद्याकडे असू शकतील. पण, अलिबागमध्ये सध्या स्थायिक असलेल्या डॉ. दीपक पाटील यांनी आपल्या पत्नीवरच्या प्रेमापोटी ‘गुलमोहोर नाजूक नात्याची हळुवार गुंत’ या मराठी चित्रपटाच्या निर्मितीचे शिवधनुष्य पेलले आहे. अलिबागमधील तरुणांचे चित्रपटनिर्मितीचे वेड पूर्ण करण्याचा ध्यास घेतलेल्या डॉ. प्रीती पाटील यांचे गेल्या वर्षी व्हॅलेंटाइन डेला निधन झाले. पत्नीचे हे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी डॉ. दीपक पाटील यांनी कंबर कसली आहे. आयआयटीतून रजत पदक मिळवणारे डॉ. दीपक पाटील आपली पत्नी प्रीती पाटील आणि मुलांसह बंगळुरू येथे व्यवसाय करीत होते. मात्र, सगळे स्थिरस्थावर असूनही आयुष्यात काही अपूर्ण आहे, ही भावना या दाम्पत्याच्या मनात घर करून होती. अखेर, हे दाम्पत्य आपला व्यवसाय सोडून अलिबागजवळच्या चोंढी गावात वास्तव्यासाठी आले. एक चार-पाच वर्षांपूर्वी या सगळ्या गोष्टींना सुरुवात झाली. बंगळुरू सोडल्यानंतर आपल्याला ग्रामीण भागातच काम करायचे आहे, हे उद्दिष्ट मनात पक्के होते. चोंढी हे अलिबागमधील गाव असल्याने मुंबईपासूनही जवळ होते, त्यामुळे इथेच स्थिरस्थावर व्हायचा निर्णय घेतल्याचे डॉ. दीपक पाटील यांनी सांगितले. सॉफ्टवेअर क्षेत्रात एवढी वर्षे घालवल्यानंतर माझा चित्रपटांशी काही संबंध येईल, अशी कल्पनाही केली नव्हती, असे डॉ. पाटील सांगतात. या मुलांमुळेच चित्रपटाचा योग जुळून आला. त्यांना चित्रपट करायची इच्छा होती. मात्र, आर्थिक अडचण समोर होतीच शिवाय, चित्रपटासंबंधीचे शिक्षण घेणेही त्यांना सहजशक्य नव्हते. इथे डॉ. पाटील यांना आपल्या आयआयटीतील मित्राची ‘चिल्लर पार्टी’ फेम दिग्दर्शक नितीश तिवारीची आठवण झाली. त्याचा विचारविनिमय घेऊन डॉ. पाटील यांनी स्वत:च चित्रपटासाठीची जुळवाजुळव सुरू केली. आणि यातूनच ‘गुलमोहोर नाजूक नात्याची हळुवार गुंत’ची सुरुवात झाली. या चित्रपटाची कथा लिहिणाऱ्या दोन तरुणांनीच या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे, असे पाटील यांनी सांगितले. चित्रीकरण सुरू असतानाच डॉक्टरांच्या पत्नीचे निधन झाले. मात्र, पत्नीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दीपक पाटील यांनी पुन्हा जोरदार तयारी केली. चित्रपटनिर्मितीचा ‘ग म भ न’ स्वत:च गिरवत या तरुणांनी भूषण प्रधान, मृण्मयी देशपांडे, उदय सबनीस आणि संजय मोने यांसारख्या दिग्गज कलाकारांबरोबर हा चित्रपट केला असल्याचे पाटील कौतुकाने सांगतात.
संग्रहित लेख, दिनांक 14th Feb 2015 रोजी प्रकाशित
प्रेमासाठी चित्रपटनिर्मिती
चित्रपटनिर्मितीत रस आहे म्हणून.. चित्रपट आवडतात म्हणून.. किंवा आहे पैसा तो चित्रपटात गुंतवायचा म्हणून.. चित्रपट बनवण्याची अशी अनेक कारणे एखाद्याकडे असू शकतील.
First published on: 14-02-2015 at 01:29 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Film produced for the love